कोल्हापूर :
राज्यातील गळीत हंगामाने आता गती घेतली आहे. 204 पैकी 190 साखर कारखान्यांची धुरांडी पेटली आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिह्यात सहकारी 26 आणि खासगी 13 कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. कोल्हापूर विभागात 78.59 लाख टन उसाचे गाळप होऊन 79.63 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात 338.94 लाख टन उसाचे गाळप करुन 291.52 लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 8.7 टक्के तर कोल्हापूर विभागाचा उतारा 10.13 टक्के आहे.
30 डिसेंबरअखेर राज्यात सहकारी 96 आणि खासगी 94 अशा 190 कारखान्यांनी हंगाम सुरू केला. मागील वर्षी याच दरम्यान 204 कारखान्यांनी 430.23 लाख टन उसाचे गाळप करुन 383.01 लाख क्विंटला साखर उत्पादित केली होती. राज्याचा सरासरी साखर उतारा 8.90 टक्के होता. यंदाच्या वर्षी उतारा सरासरी काही अशांनी घटला आहे. कोल्हापूर विभागात 39 कारखान्यांनी 2 लाख लाख 27 हजार 800 लाख टन डेली क्षमतेने गाळप हंगाम सुरू केला आहे.
पुणे विभागात 31 कारखान्यांनी 84.64 लाख टन गाळप करुन 73.68 लाख क्विंटल साखर उत्पादित केली. पुण्याचा सरासरी साखर उत्तार 8.71 टक्के आहे. सोलापूर विभागात 41 कारखान्यांनी 59.32 लाख टन उसाचे गाळप झाले आहे, तर साखर उत्पादन 45.21 लाख क्विंटल झाले. येथील साखर उतारा सरसरी 7.62 टक्के आहे. अहमदनगर विभागातील 25 कारखान्यांनी 43.19 लाख टन गाळप तर 34.37 लाख क्विंटल 7.96 टक्के उताऱ्याने घेतली. छत्रपती संभाजीनगर विभागातील 19 कारखान्यांनी 30.08 लाख टन उसाचे गाळप आणि 21.6 लाख क्विंटल साखर उत्पादित केली. सरासरी उतार 7.18 टक्के मिळाला. नांदेड 28 कारखान्यांनी 38.84 लाख टन उसाचे गाळप करुन 33.74 लाख क्विंटल साखरेच उत्पादन घेत 8.69 टक्के उतारा मिळवला. अमरावती विभागातील चार कारखान्यांनी 3.67 लाख टन उसाचे गाळप केले आहे. 2.99 लाख क्विंटल साखर उत्पादन तर 8.15 टक्के उतार मिळाला. नागपूर विभागातील तीन खासगी कारखान्यात 0.61 लाख टन उसाचे गाळप झाले.
कोल्हापूर विभाग आघाडीवर
गाळपात पुणे विभाग आघाडीवर आहे तर कोल्हापूर विभागाने रोज दोन लाख 27 हजार 801 लाख टन गाळप क्षमतेने राज्यात सर्वाधिक 79.63 लाख क्विंटल साखर उत्पादन घेऊन आघाडीवर आहे. कोल्हापूर विभागाचा साखर उतारा राज्यात सर्वाधिक 10.13 आहे.








