8-10 जानेवारीदरम्यान प्रदर्शन
बेळगाव : बेळगाव पोस्ट विभागाच्यावतीने 8 ते 10 जानेवारीदरम्यान जिल्हास्तरीय फिलॅटेली प्रदर्शन ‘इक्षुपेक्स-2025’चे आयोजन करण्यात आले आहे. हिंदवाडी येथील महावीर भवन येथे हे प्रदर्शन भरविले जाणार असून देशभरातील विविध राज्यांची पोस्ट तिकिटे नागरिकांना एकाच ठिकाणी पाहता येणार आहेत. त्याचबरोबर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बेळगाव पोस्ट विभागाचे अधीक्षक विजय वडोनी यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पोस्ट विभागाकडून अनेक तिकिटे काढली जात असतात. काही पोस्ट तिकिटे विशेष कालावधीसाठी काढल्याने त्यांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी फिलॅटेली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. एखादे तिकीट काही घटनांच्या स्मरणार्थ काढले, असेल तर त्यांची संपूर्ण माहिती शेजारी दिली जाणार आहे. यामुळे एखादी घटना व त्यामागील इतिहास नागरिकांपर्यंत पोहोचविणे सोयीचे होणार आहे. या निमित्ताने प्रश्नमंजुषा कार्यशाळा, निबंध स्पर्धा आयोजिण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. प्रत्येक शाळांना प्रदर्शनाचे निमंत्रण पाठविले असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रदर्शनामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी साहाय्यक पोस्ट अधिकारी इराण्णा मुतवल्ली, एम. बी. शिरूर उपस्थित होते.









