दिव्याखाली अंधार, कचरा समस्येवर तोडगा काढण्याची आवश्यकता
बेळगाव : शहरातील ब्लॅक स्पॉट हटविण्यासाठी महानगरपालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. खुल्या जागेत कचरा टाकल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी सूचना फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. मात्र अनगोळ परिसरात लावण्यात आलेल्या सूचना फलकाच्या खालीच कचरा टाकला जात आहे. त्यामुळे दिव्याखाली अंधार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहर आणि उपनगरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. कचरा वाढत चालला असून त्याची वेळेत उचल केली जात नसल्याची ओरड कायम आहे. त्यातच आता ओला आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात यावे अशी सूचना करण्यात आली असल्याने सफाई कर्मचारी कचऱ्याचे वर्गीकरण करत आहेत.
पण या सर्व प्रक्रियेला विलंब लागत असल्याने शहरात जिकडे तिकडे कचराच कचराच पहावयास मिळत आहे. कचरा कोठेही न टाकता तो कचरा कुंडीत टाकण्यात यावा, अशी सूचना केली जात आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करत नागरिकांकडून जागा मिळेल त्याठिकाणी कचरा फेकून दिला जात आहे. त्यासाठी महापालिकेच्यावतीने शहरात सूचना फलक लावण्यात आले आहेत. कचरा कुंडी व्यतिरिक्त कोठेही कचरा टाकल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा मजकूर त्यावर लिहिण्यात आला आहे. पण अनगोळ परिसरात सदर सूचना फलकाच्या खालीच कचऱ्याचे ढीग पडले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस गंभीर स्वरुप धारण करणाऱ्या कचरा समस्येवर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.









