कोल्हापूर / सुधाकर काशीद :
वाढदिवसाचे डिजिटल फलक, विधानसभा निवडणुकीचा निकालाच्या भव्य दिव्य फलकाचा अजूनही कोल्हापुरातल्या रंकाळा चौपाटीला वेढाच पडला आहे. रंकाळ्याची एक बाजू या भल्या–मोठ्या फलकांनी झाकून गेली आहे. रंकाळा स्टॅंडवरून रंकाळा चौपाटीकडे येणाऱ्या पर्यटकांना ते रंकाळा तलावाच्या समोर उभे राहिले तरी रंकाळा तलाव त्यांच्या नजरेस येणार नाही, अशी या चौपाटीची या क्षणाची अवस्था आहे. ठराविकांच्या वाढदिवसासाठी, निवडणुकीच्या अभिनंदनासाठीच रंकाळा चौपाटीचा हा कोपरा त्यांना खंडून दिला असल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे रंकाळ्याच्या समोर उभे राहिले तरी रंकाळा कोठे आहे, हे विचारायची आता वेळ आली आहे.
महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक आहे. ते हॉटेलच्या दारातील जेवण तयार आहे, जेवण संपले आहे, असे छोटे–छोटे फलक तातडीने उचलते. भाजी, गाजर, कोथिंबीर, कणीस घेऊन विक्रीसाठी बसलेल्या ग्रामीण भागातील लोकांच्या बुट्ट्याही पटापट उचलते. पण या ठराविक लोकांच्या फलकाला हात लावण्याचे धाडस अतिक्रमण निर्मूलन पथकात नाही, हे वास्तव आहे. या ठराविकांच्या चेहऱ्यांनी कायम सजलेल्या डिजिटल फलकांनी चौपाटीच्या दगडी नक्षीदार कमानीही पूर्ण झाकल्या गेल्या आहेत. पण या फलकाला हात लावला जात नाही. कारण फलकावरच्या काही चेहऱ्यांची दहशतच वेगळी आहे. त्यामुळे गेली 25 ते 30 दिवस हे फलक रंकाळा चौपाटीला वेढा घालून उभे आहेत. ‘आता कसं? साहेब म्हणतील तसं’ असली इशारेवजा भाषा या फलकावर आहे. अर्थात त्यासोबत गॉगल, गळ्dयात साखळ्dया, चटपटीत शर्ट अशी सारी डिजिटल पुढाऱ्यांची वैशिष्ट्यो या फलकावर आहेत.
रंकाळा चौपाटीवरचे हे फलक केवळ एक उदाहरण आहे. पण शहरातील ठराविक चौकात ठराविकांचेच फलक असणार, अशा पद्धतीने जागा वाटून घेतल्या गेल्या आहेत. मिरजकर तिकटी, निवृत्ती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, बिंदू चौकाचा कोपरा, उमा टॉकीज, शाहू स्मारकची पिछाडी, तोरस्कर चौक, गंगावेश, शिवाजी पूल, उभा मारुती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जनता बाजार चौक, ताराराणी चौक, न्यू पॅलेसकडे जाणाऱ्या रस्त्याचा कोपरा, बी. टी. कॉलेज चौक, गोकुळ हॉटेल चौक, बागल चौक, फुलेवाडी लक्षतीर्थ कॉर्नर, शुक्रवार गेट पोलीस चौकी, गोखले कॉलेज कॉर्नर ही ठिकाणे कायम कोणाच्या ना कोणाच्या व डिजिटल फलकांनी झाकली गेली आहेत. ठराविक कॉर्नरला तर ठराविकांचे तेच ते चेहरे असणार, हेही ठरुन गेले आहे. त्याहून विशेष असे की अधिकृत होर्डिंगवरही दादागिरीने आपले फलक लावण्याचे अनेकांचे धाडस झाले आहे आणि उगीच कशाला वांदे करायचे म्हणून होर्डिंग व्यावसायिक फक्त बघत बसले आहेत.
या फलकाचा उद्देश केवळ आपली प्रतिमा झळकवणे एवढाच आहे. किंवा नेत्यांबद्दलचे आपले प्रेम दाखवण्यासाठी आहे. जरूर नेता–कार्यकर्ता यांच्यात स्नेहबंध राहिला पाहिजे. पण सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मोठेच्या मोठे फलक का उभे राहतात आणि ते फलक उतरून घेण्यास अधिकारी का कचरतात, हा कोल्हापूरकरांच्या मनातील खदखदता प्रश्न आहे आणि या परिस्थितीत काही बदल होणार नाही, याचीही खात्री आहे. निधनाचे श्रद्धांजली फलक तर इतके आहेत की, त्या सगळ्या फलकावर एकच चार ओळीची कविता फक्त मृताचे नाव बदलून कॉमन वापरली जात आहे.
आपला फलक महिनाभर एका ठिकाणी आहे, तो काढावा, शहराचे विद्रूपीकरण थांबवावे, असे यातल्या कोणालाही वाटत नाही. पण म्हणून महापालिकाही काही कारवाई करत नाही किंवा अशा वजनदार लोकांच्या डिजिटल फलकावर कारवाई राहूदेच. पण त्या फलकाकडे बघायचे त्यांचे धाडस होत नाही. त्यामुळे शहरातले सर्व प्रमुख चौक अशा ठराविक चेहऱ्याच्या फलकांनी वेढले गेले आहेत. या सर्व रस्त्यांवरून जाताना अधिकाऱ्यांनी थोडी काच खाली करून जरा दोन्ही बाजूला पाहिले तरी त्यांना या चेहऱ्यांचे दर्शन होणार आहे. नाही तर या डिजिटल फलकावर झळकण्याचे व्यसनच लागलेल्या लोकांनी प्रशासनाचे अस्तित्वच ठोकरुन लावले आहे. त्यामुळे कोल्हापुरात खमक्या प्रशासनाची या क्षणी गरज आहे. सोयीनुसार कारवाई, जेथे प्रतिकार होणार नाही, तेथे कारवाई, ‘जिथे विरोधाची शक्यता तेथे नरमाई’ हे धोरण बदलण्याची गरज आहे. अशावेळी महापालिकेच्या तृतीय, चतुर्थ कर्मचाऱ्यांना अभय देण्याची आवश्यकता आहे. नाही तर सारे शहर फलकांनीच वेढले जाणार, हे स्पष्ट आहे.








