वृत्तसंस्था / चेन्नई
तामिळनाडूच्या विद्युतवितरण कंपनीने अदानी उद्योग समूहाच्या विद्युत कंपनीला दिलेली निविदा रद्द करण्यात केली आहे. अदानी समूहाच्या या कंपनीला तामिळनाडूतील वीज ग्राहकांना ‘स्मार्ट मीटर्स’ पुरविण्याची निविदा दिली होती. मात्र, कंपनीने अधिक दर लावल्याचे कारण पुढे करत ही निविदा रद्द करण्यात आली. त्यामुळे हा अदानी समूहाच्या कंपनीला झटका मानण्यात येत आहे.
चार पॅकेजिस मध्ये असलेली ही निविदा 23 ऑगस्टला सादर करण्यात आली होती. स्मार्ट मीटर्स पुरविण्याची ही योजना केंद्र सरकारची आहे. मात्र, ती लागू करण्याचे उत्तदायित्व राज्य सरकारांच्या वीज वितरण कंपन्यांचे आहे. पॅकेज क्रमांक 1 साठी अदानी समूहाने सादर केलेली निविदा सर्वात कमी किमतीची होती. या पॅकेजमध्ये तामिळनाडूतील राजधानी चेन्नईसह आठ जिल्ह्यांचा समावेश होता. एकंदर 82 लाखांहून अधिक स्मार्ट मीटर्स प्रथम पॅकेजमध्ये बसविले जाणार होते.
अदानी समूह वादात
भारतात सौर ऊर्जा निर्मिती करण्यासाठी अदानी उद्योग समूहाने विविध राज्यांच्या प्रशासनांना हजारो कोटी रुपयांची लाच दिली असा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला आहे. अदानी समूहाने हा आरोप स्पष्टपणे फेटाळला आहे. तरीही हा आरोप झाल्यामुळे या समूहाचे संस्थापक आणि प्रवर्तक गौतम अदानी हे वादात सापडले आहेत. त्यामुळे या उद्योग समूहाला देण्यात आलेली अनेक कंत्राटे विदेशात रद्द करण्यात आली आहेत. भारतात विरोधी पक्षांनी, विशेषत: काँग्रेसेन अदानी यांच्या विरोधात अभियान चालविले असून गौतम अदानी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अदानी यांचे संरक्षण करीत आहेत. अदानी समूहासाठी ते राजकीय शक्तीचा उपयोग करीत आहेत, असेही केँग्रेसचे म्हणणे आहे.









