भारतीय जनता पक्षावर केले अनेक आरोप
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय जनता पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी मते खरेदी करत आहे. आपल्याला हे मान्य आहे काय आणि आपण या पक्षाचा प्रचार करणार आहात काय, अशी विचारणा करणारे पत्र दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पाठविले आहे. त्यांनी पत्रात भारतीय जनता पक्षावर अनेक आरोप केले आहेत. दिल्लीमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे हे पत्र महत्वाचे मानले जात आहे.
दलित आणि पूर्वांचली मतदारांची नावे मतदारसूचीतून हेतुपुरस्सर वगळली जात आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करीत आहे. भ्रष्टाचाराचा आधार हा पक्ष घेत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची या साऱ्या कृत्यांना मान्यता आहे काय ? जे चालले आहे ते लोकशाहीला बळकट करणारे आहे, अशी संघाची धारणा आहे काय, असेही प्रश्न या पत्रात आहेत.
कक्कर यांचा आरोप
केजरीवाल यांच्या पत्राआधी आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रियांका कक्कर यांनी असेच आरोप भारतीय जनता पक्षावर केले होते. या पक्षाचे नेते विशाल भारद्वाज यांनी अनेक मतदारांची नावे वगळण्यासाठीची आवेदनपत्रे केंद्रीय निवडणूक आयागोकडे सादर केली आहेत. आयोग त्या आवेदनपत्रांना आधार मानून कार्य करीत आहे. आम्ही आक्षेप घेतल्यानंतर आता हे प्रकार थांबले आहेत. मात्र, यामुळे वातावरण दूषित होत आहे, असे कक्कर यांचे प्रतिपादन होते.
पैसे वाटल्याचा आरोप
भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवेश शर्मा यांच्यावरही कक्कर यांनी आरोप केले. नवी दिल्ली मतदारसंघात शर्मा यांनी मतदारांना आतापासूनच पैसे वाटण्यास प्रारंभ केला आहे. तसेच अनेक मतदारांची नावे मतदारसूचीतून काढून टाकण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. भारतीय जनता पक्ष घाबरला आहे, हे या कृतींवरुन दिसून येते, असेही अनेक आरोप प्रियांका कक्कर यांनी या पक्षावर केले आहेत.
आयोगाचे प्रत्युत्तर
भारतीय जनता पक्ष मतदारसूचींमध्ये स्वत:ला अनुकूल असे परिवर्तन करीत आहे. अनेक नवी नावे समाविष्ट केली जात आहेत. तर अनेक जुनी नावे वगळली जात आहेत. प्रत्येक मतदारसंघात आपले मतदार वाढावेत, असा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे. हा पक्ष यंत्रणा वेठीस धरुन निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे, हे आम आदमी पक्षाचे आरोप धडधडीत खोटे आहेत, असे केंद्रीय निवडणूक आयोगानेही स्पष्ट केले आहे. आयोग कोणत्याही पक्षाच्या दबावात येऊन काम करीत नाही. तसेच मतदारसूचींमध्ये सुधारणा नेहमीच कराव्या लागतात. ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून ती पूर्णत: लोकप्रतिनिधी कायद्यातील नियमांच्या अनुसारच होत असते. ही प्रक्रिया पूर्णत: पारदर्शी असून सर्व संबंधितांना त्यांचा पक्ष मांडण्याची संधी आयोगाकडून दिली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुरळीत आणि नियमबद्ध पद्धतीने चालली असून शंकेला जागा नाही, अशी आपली भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केली आहे.
घोषणा होण्यापूर्वीच तापले वातावरण
दिल्ली विधानसभा निवडणूक याच वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात होण्याची शक्यता आहे. अद्याप केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीची घोषणा केलेली नाही. निवडणुकीचा कार्यक्रम येत्या दोन आठवड्यांमध्ये घोषित होण्याची शक्यता आहे. मात्र, आतापासूनच वातावरणनिर्मिती केली जात आहे. आम आदमी पक्षाने अनेक उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून काँग्रेसनेही काही नावे घोषित केली आहे. भारतीय जनता पक्ष येत्या काही दिवसांमध्ये नावे उघड करणार आहे.
दिल्ली निवडणूक तिरंगी होणार
ड काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात युती न होण्याची शक्यता अधिक
ड भारतीय जनता पक्ष, आम आदमी पक्ष आणि काँग्रेस अशी त्रिकोनी स्पर्धा
ड भारतीय जनता पक्षाकडून लवकरच उमेदवारांची सूची घोषित केली जाणार









