पत्नी, बाळाच्या मृत्यूचा धक्का बसल्याने पतीने केले विष प्राशन
बेळगाव : तज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूती विभागातून हुबळी येथील किम्स हॉस्पिटलला पाठविण्यात आलेल्या त्या गर्भवतीचा उपचाराचा उपयोग न झाल्याने अखेर मृत्यू झाला. राधिका मल्लेश गद्दीहोळ्ळी (वय 19, रा. मेलमट्टी, ता. गोकाक) असे तिचे नाव आहे. पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजताच पती मल्लेश याने विष प्राशन केल्याने त्याच्यावर किम्स हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या राधिका हिच्या गर्भातच अर्भकाचा मृत्यू झाला. तिला बेशुद्धावस्थेत फिट्स येत असल्यामुळे सुरुवातीला यमकनमर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यानंतर अधिक उपचारासाठी एका नामांकित खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्या ठिकाणी उपचारासाठी अधिक खर्च येत असल्याचे लक्षात येताच राधिकाला गंभीर अवस्थेत सिव्हिलमधील प्रसूती विभागात रविवार दि. 29 रोजी पहाटे चारच्या दरम्यान दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी तिच्या गर्भातच बाळाचा मृत्यू झाल्याचे निदान करण्यात आले. मेंदूशी संबंधित आजार असल्याचे लक्षात येताच त्या ठिकाणी मेंदूसंबंधी डॉक्टर उपलब्ध नसल्याने अधिक उपचारासाठी हुबळी येथील किम्स हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, त्या ठिकाणीही उपचाराचा उपयोग न झाल्याने अखेर तिचा मृत्यू झाला. पत्नीसह बाळाचा मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झालेल्या पतीने त्याचठिकाणी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर किम्स रुग्णालयातील उपचार सुरू आहेत.









