नागरिकांना ओला-सुका कचरा वेगवेगळा करून देण्याची सूचना
बेळगाव : ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्यावरून वादावादीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आता नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. मंगळवार दि. 31 रोजी शहरात ठिकठिकाणी लोकांच्या गाठीभेटी घेऊन कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासंदर्भात माहिती देत मनपा आरोग्य खात्याने जागृती केली. महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांकडून आयुक्तांच्या आदेशाचे पालन केले जात आहे. पण कचरा देणाऱ्या नागरिकांकडून वर्गीकरण करण्याआधीच सुका आणि ओला कचरा एकत्र दिला जात आहे.
कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास सफाई कर्मचाऱ्यांना विलंब लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करून द्यावे, असे सांगितले जात आहे. पण याला आक्षेप घेत काही जण सफाई कर्मचाऱ्यांशी वाद घालत आहेत. यामुळे कचरा उचल करण्यावर परिणाम होत असल्याने लोकांमध्ये आता कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासंदर्भात जागृती केली जात आहे. मनपाच्या आरोग्य खात्याचे अधिकारी व कर्मचारी मंगळवारी शहर व उपनगरात फिरून लोकांमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासंदर्भात जागृती करत होते. त्यामुळे यापुढे लोकांना कचरावाहू वाहनांकडे कचरा देताना ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून द्यावे लागणार आहे.









