वृत्तसंस्था/ अहमदाबाद
येथील गुजरात स्टेडियमवर झालेल्या विजय हजारे ट्रॉफीतील क गटातील सामन्यात पंजाबने सौराष्ट्राचा 57 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्मा (96 चेंडूत 170) व प्रभसिमरन सिंग (95 चेंडूत 125) यांच्या तुफानी शतकी खेळीच्या जोरावर पंजाबने 50 षटकांत 5 गडी गमावत 424 धावा केल्या. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना सौराष्ट्राचा डाव 367 धावांत आटोपला.
अहमदाबादच्या गुजरात कॉलेज मैदानावर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर पंजाबला संघाने 31 षटकांत 298 धावा केल्या. कर्णधार अभिषेक शर्माने स्फोटक फलंदाजी केली आणि दुसऱ्या बाजून प्रभसिमरन सिंगनेही शानदार साथ दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 298 धावा केल्या. विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्या विकेटसाठीची ही सर्वोच्च भागीदारी आहे. यादरम्यान टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिषेक शर्माने तुफान फटकेबाजी केली. त्याने 96 चेंडूत 22 चौकार आणि 8 षटकार ठोकले. प्रभसिमरनने 95 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार आणि 8 षटकार मारले. त्याने 125 धावा केल्या. याशिवाय, अनमोल मल्होत्राने 48 तर सनवीर सिंगने 40 धावा केल्या. या जोरावर पंजाबने षटकांत 5 गडी गमावत 424 धावांचा डोंगर उभा केला.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना सौराष्ट्रानेही पंजाबला जोरदार टक्कर दिली पण त्यांचा संघ 367 धावांत ऑलआऊट झाला. सौराष्ट्राकडून अर्पित वासवदाने सर्वाधिक 104 धावा केल्या. तर हार्विक देसाईने 59 तर जयदेव उनादकटने 48 धावा केल्या. इतर सौराष्ट्राच्या फलंदाजांना मात्र अपेक्षित कामगिरी करता आली नाही.
महाराष्ट्राचा सलग पाचवा विजय
मुंबई : विजय हजारे ट्रॉफीत दमदार फॉर्ममध्ये असणाऱ्या महाराष्ट्राने सिक्कीमला पराभूत करत सलग पाचव्या विजयाची नोंद केली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सिक्कीमने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 बाद 234 धावा केल्या. यानंतर विजयासाठीचे आव्हान महाराष्ट्राने 34 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यातच पार केले. महाराष्ट्राकडून ओम बनसोडने सर्वाधिक नाबाद 94 धावांचे योगदान दिले. सिद्धेश वीरने 64 तर निखील नाईकने 46 धावा फटकावल्या.









