वृत्तसंस्था/ ओटावा
मॅक्सिम स्ट्रबॅकने जादा वेळेत 2.55 मिनिटांनी गोल करून स्लोवाकियाला वर्ल्ड ज्युनियर हॉकी चॅम्पियनशिपमध्ये कझाकस्तानवर 5-4 असा विजय मिळवून दिला. नियमित वेळेत स्लोवाकियाने 4-2 अशी आघाडी घेतली होती आणि पाच मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना कझाकस्तानने दोन गोल केले. यामुळे सामना जादा वेळेत गेला.
डावलत नुरकेनोव्हने तिसऱ्या कालावधीच्या 16.37 मिनिटांनी गोल केला आणि किरिल ल्यापुनोव्हने फक्त 29 सेकंद शिल्लक असताना बरोबरी साधली. स्लोवाकियासाठी दालिबोर ड्वोर्स्की आणि जुराज पेकार्सिकने प्रत्येकी दोन गोल केले. स्लोवाकियाने दोनदा तीन गोलांची आघाडी राखली. पण गोलरक्षक सॅम्युअल अर्बनने 17 फटक्यांवर चार गोल स्वीकारल्याने ती टिकली नाही. सारकेनोव्ह आणि आर्टुर ग्रॉस यांनी कझाकस्तानसाठी गोल केले. व्लादिमीर निकितिनने कझाकस्तानतर्फे 37 फटके निष्फळ ठरविले. त्यात जादा वेळेतील दोन फटक्यांचाही समावेश होता.









