अमेरिकन कंपन्यांकडून फीडबॅक घेतेय आयटी मंत्रालय : ट्रम्प यांच्या धोरणांबाबत सध्या अनिश्चितता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेत मागील काही दिवसांपासून एच-1बी व्हिसावरून चर्चा सुरू आहे. आता भारतीय एच-1बी व्हिसाधारकांना होत असलेल्या विरोधावरून केंद्र सरकारही अलर्ट झाले आहे. सरकार अमेरिकेत एच-1बी व्हिसाधारक म्हणून काम करत असलेल्या भारतीय तंत्रज्ञांच्या स्थितीवर नजर ठेवून आहे.
आयटी आणि मॅनेजमेंट प्रोफेशन्सच्या प्रोफाइलिंगवर सरकार करडी नजर ठेवून आहे. माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाबरोबरच विदेश मंत्रालय आणि वाणिज्य मंत्रालय देखील घटनाक्रमावर नजर ठेवून आहे. दरवर्षी सर्वाधिक एच-1बी व्हिसा हा भारतीय प्रोफेशनल्सना प्राप्त होतो. तसेच एच-1बी व्हिसाकरता भारतीयांमध्ये मोठी चढाओढही दिसून येते.
भारतीय प्रोफेशनल्सना अमेरिकेत वास्तव्य करताना त्रास होईल अशाप्रकारची स्थिती निर्माण होऊ नये याकरता केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. आयटी मंत्रालय देखील स्थिती समजून घेण्यासाठी दिग्गज सॉफ्टवेअर कंपन्यांकडून फीडबॅक घेत आहे. अमेरिकेत व्हिसावरून स्थिती कशाप्रकारची आहे अशी विचारणा आयटी मंत्रालयाने अमेरिकेच्या कंपन्यांना केली आहे.
आयटी मंत्रालय अमेरिकेतील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी दिग्गज सॉफ्टवेअर कंपन्यांसोबत नॅस्कॉमकडून फीडबॅक प्राप्त करत आहे. भारत-अमेरिकेच्या दरम्यान कायदेशीर चौकटीत कुठल्याही बर्हिगत कारणामुळे अडचणी निर्माण होऊ नयेत अशी सरकारची इच्छा आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून व्हाइट हाउसमध्ये परतल्यावर अमेरिकन व्हिसा धोरणे विशेषकरून माहिती-तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि अन्य कुशल तंत्रज्ञांसाठी कशाप्रकारे आखली जातात यावर सरकार नजर ठेवून आहे.
एलन मस्क यांचे वक्तव्य
अमेरिकेचे आगामी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वर्तमान व्हिसा धोरणाच्या विरोधात राहिले आहेत. तर त्यांचे समर्थक अब्जाधीश उद्योजक एलन मस्क यांनी एच-1बी व्हिसावरून मोठी घोषणा केली आहे. एच-1बी व्हिसा संपुष्टात आल्यासारखे आहे. अमेरिकेत कुशल विदेशी कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी वापरण्यात येणारी प्रणाली तुटली असून या मोठ्या सुधारणा करण्याची गरज असल्याची भूमिका मस्क यांनी मांडल आहे. तर दुसरीकडे ट्रम्प यांना भारतासाठी अनुकूल मानले जात असल्याने एच-1बी व्हिसाच्या भविष्यावरून साशंकता निर्माण झाली आहे.
एच-1बी व्हिसा
एच-1बी व्हिसा एक बिगर स्थलांतरित व्हिसा आहे. उच्चशिक्षणप्राप्त विदेशी प्रोफेशनल्सना ‘विशेष व्यवसायां’मध्ये काम करण्याची अनुमती हा व्हिसा देतो. या व्यवसायांसाठी काम करण्यासाठी कमीतकमी पदवीधर असणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान, इंजिनियरिंग, गणित आणि वैद्यकीय शास्त्र यासारख्या क्षेत्रांमध्ये या व्हिसाकरता सर्वाधिक अर्ज प्राप्त होत असतात.









