कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या युवकाच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेतील कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान प्रकरणातला भ्रष्टाचार उघड करणारा भारतीय तंत्रज्ञ रुचिर बालाजी याच्या अमेरिकेत झालेल्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. बालाजी यांचा मृत्यू नैसर्गिक नसून ती हत्या असल्याचे वाटते असे विधान अमेरिकेचे विख्यात उद्योगपती इलॉन मस्क यांनी केल्याने बालाजी यांच्या मृत्यूविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बालाजी यांच्या मातेनेमृत्यूची नव्याने चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
अमेरिकेत सध्या सत्तांतराचे वारे वाहत असून 20 जानेवारीला भावी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. त्यांनी उद्योग आणि तंत्रज्ञान विषयक धोरण ठरविण्याचे उत्तरदायित्व इलॉन मस्क आणि भारतीय वंशाचे उद्योगपती विवेक रामस्वामी यांच्यावर सोपविली आहे. ते ट्रंप यांचे निकटचे सहकारी म्हणून त्यांच्या प्रशासनात काम पाहणार आहेत. असे महत्वाचे पद मिळालेल्या मस्क यांनी बालाजी यांच्या मृत्यूच्या कारणाविषयी शंका व्यक्त केल्याने ट्रंप प्रशासन काळात या मृत्यूची नव्याने चौकशी होण्याची शक्यता आहे.
प्रकरण काय आहे…
रुचिर बालाजी हा भारतीय वंशाचा बुद्धीमान तंत्रज्ञ अमेरिकेत ओपन एआय कंपनीच्या चॅट जीटीपी क्षेत्रात ज्येष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करीत होता. तथापि, कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि गैरप्रकार चालत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने या संबंधीची माहिती मिळवून ती आपल्या संगणकात साठविली होती. सर्व पुरावे संकलित करुन हा भ्रष्टाचार उघड करण्याची त्याची योजना होती. त्याने काही मुद्दे उघड पेलेही होते. तथापि, त्याची काही दिवसांपूर्वी त्याचा त्याच्या वास्तव्याच्या घरात मृत्यू झाल्याचे दिसून आले. हा मृत्यू नैसर्गिक असल्याचा आणि यात कोणताही घातपात नसल्याचा अहवाल पोलिसांनी दिला होता. तथापि, बालाजी यांचे मित्र आणि निकटवर्तीय यांनी या मृत्यूसंबंधी संशय व्यक्त करत ही हत्या असल्याचा आरोप केला होता.
मातेचे म्हणणे काय…
बालाजी यांच्या माता पूर्णिमा राव यांनी ही हत्याच असल्याचे ठाम प्रतिपादन केले आहे. बालाजी यांच्या निवासस्थानी त्यांच्या संगणकाची तोडफोड केल्याचे आढळले आहे. त्यातील पुष्कळशी माहिती डिलीट करण्यात आली आहे. तसेच, बालाजी यांच्या शयनकक्षात शोधाशोध केल्याच्या खुणा होत्या. स्वच्छता गृहात रक्ताचे डाग आढळून आले होते. हे सर्व दृष्य नैसर्गिक मृत्यू किंवा आत्महत्या असल्याचे नव्हते. घटनास्थळी अनेक संशयास्पद घडामोडी घडल्याचे स्पष्ट दिसून येत असतानाही पोलिसांनी कोणताही घातपात नसल्याचा अहवाल दिल्यामुळे त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज देण्यास आणि मृतदेहाच्या उत्तरीय परीक्षणाचा अहवाल देण्यासही पोलिसांनी नकार दिल्याचे प्रतिपादन पूर्णिमा राव यांनी केले आहे. त्यांनी फेरतपासणीची मागणी केली आहे.
न्याय मिळेल काय ?
रुचिर बालाजी हे बुद्धीमान तंत्रज्ञ तर होतेच, पण त्यांनी ‘भ्रष्टाचारसूचका’चे (व्हिसलब्लोअर) महत्वाचे काम केले आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता हे क्षेत्र नवे आहे. ते अद्याप तसे बाल्यावस्थेतच आहे. या क्षेत्रात भ्रष्टाचार किंवा गैरप्रकार होऊ लागल्यास ते जगाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरु शकते, असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण असल्याची आवश्यकता आहे. अनेक देशांच्या प्रशासनांनी या तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगामुळे होऊ शकणाऱ्या घातक दुष्परिणामांवर भाष्य केले आहे. रुचिर बालाजी यांच्या मृत्यूचा योग्य प्रकारे तपास होऊन त्यांना न्याय मिळण्याची आवश्यकता याचकरीता आहे.









