येमेनच्या अध्यक्षांकडून फाशी देण्यास अनुमती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केरळच्या नर्स निमिषा प्रिया यांची संभाव्य फाशी टळावी यासाठी केंद्र सरकार आवश्यक ते सर्व साहाय्य करण्यात सज्ज आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रिया यांनी येमेन या देशात आपला पती अब्दो महदी याची हत्या केल्याचा आरोप आहे. प्रिया यांना 2020 मध्ये येमेनच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. आता या शिक्षेला येमेनच्या अध्यक्षांनी संमती दिल्याने एक महिन्याच्या आत त्यांना केव्हाही फाशी दिली जाऊ शकते. त्यामुळे त्यांचे भारतातील कुटुंबिय वेगाने प्रयत्न करत असून केंद्र सरकारही लक्ष घालत आहे.
निमिषा प्रिया या मूळच्या केरळच्या आहेत. त्यांनी नर्सिंगचा अभ्यासक्रम केरळमध्ये पूर्ण केल्यानंतर त्या नोकरीसाठी येमेन देशात गेल्या होत्या. तेथे त्यांनी अब्दो महदी या येमेनी नागरीकाच्या समवेत एक रुग्णालय सुरु केले. कालांतराने या दोघांनी विवाह केला. तथापि, पती प्रिया यांचा कमालीचा छळ करीत असे. त्यांना मारहाण करत असे. तसेच त्याने प्रिया यांचा पासपोर्ट आणि व्हिसाही त्यांच्याकडून हिसकावून घेतला होता, असा आरोप प्रिया यांनी केला आहे. अखेरीस त्यांनी 2019 मध्ये पतीच्या छळाला कंटाळून त्याची हत्या केली होती, असा त्यांच्यावर आरोप आहे. पतीच्या मृतदेहाचे तुकडे करुन त्यांनी ते आपल्या घराच्या परिसरात पुरले होते. हत्या करण्यापूर्वी त्यांनी पतीला बेशुद्ध पडण्याचे औषध देऊन त्याने काढून घेतलेला पासपोर्ट आणि व्हिसा परत मिळविला होता.
येमेनमध्ये अभियोग
प्रिया यांच्यावर येमेनमध्ये पतीची हत्या केल्याच्या गुन्ह्याखाली अभियोग चालविण्यात आला होता. त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले आहेत असे स्पष्ट करत तेथील कनिष्ठ न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. येमेन मधील वरीष्ठ न्यायालयांनीही ही शिक्षा कायम केली होती. त्यांची फाशी टळावी म्हणून भारत सरकारने बरेच प्रयत्न केले होते. तसेच एका आंतरराष्ट्रीय मानवतावादी संघटनेनेही ‘सेव्ह निमिषा प्रिया’ हे अभियान चालविले होते. येमेन येथील वकीलाने त्यांचे प्रकरण चालविण्यासाठी एकंदर 40 हजार डॉलर्स (जवळपास 35 लाख रुपये) इतकी फी मागितली होती. या रकमेपैकी जवळपास निम्मी रक्कम देण्यात आली होती. तथापि, वकीलाने पूर्ण फी मिळाल्याशिवाय बाजू मांडण्यास नकार दिला होता. प्रिया यांच्या भारतातील नातेवाईकांकडे इतके पैसे नसल्याने या संघटनेने लोकवर्गणीतून पैसे जमा केले होते. ही प्रक्रिया आजही होत आहे.
ठोठावली फाशीची शिक्षा
प्रिया यांना वाचविण्याचे प्रयत्न होत असतानाच येमेन येथील कनिष्ठ न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. पतीची हत्या केल्याचा गुन्हा त्यांच्यावर सिद्ध झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. नंतर चार वर्षे केंद्र सरकार आणि प्रिया यांचे नातेवाईक यांनी ब् ारेच प्रयत्न केले. प्रिया यांच्या पतीच्या कुटुंबियांना हानीची भरपाई देऊन (ब्लड मनी) प्रिया यांची सुटका करण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. मात्र, याचा उपयोग न होता येमेनच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांची फाशीची शिक्षा कायम राहिली होती. त्यानंतर गेल्या सोमवारी येमेनच्या अध्यक्षांनी या शिक्षेचे क्रियान्वयन करण्यास अनुमती दिली.
आता अखेरची संधी
फाशीची शिक्षा रद्द करण्याचे अधिकार येमेनच्या अध्यक्षांना आहेत. त्यामुळे आता प्रिया यांच्याकडे केवळ तीन आठवड्यांचा कालावधी आहे. या कालावधीत त्यांच्या प्रयत्नांना यश आले तर त्यांची फाशी टळू शकते. आता त्यांचे भवितव्य येमेनच्या अध्यक्षांच्या हाती आहे. भारत सरकारने या प्रकरणी लक्ष घालून प्रयत्न चालविले आहेत. भारताच्या येमेनमधील दूतावासाच्या माध्यमातून येमेनच्या अध्यक्षांशी संपर्क केला जात आहे. प्रिया यांचे कुटुंबियही प्रयत्न करीत आहेत.









