हुल्लडबाजांवर कठोर कारवाईचा पोलीस आयुक्तांचा इशारा
बेळगाव :
नववर्षाच्या स्वागतासाठी बेळगाव सज्ज झाले आहे. यावेळी कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मंगळवारी रात्री संपूर्ण शहरात पोलिसांची गस्त असणार आहे. शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी दिला आहे.
शहरातील सर्व अधिकाऱ्यांना यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या बंदोबस्तासाठी उपलब्ध आहेत. आणखी एक अतिरिक्त तुकडी मागविण्यात आली आहे. नागरी पोलिसांबरोबरच गृहरक्षक दलाचे 300 जवानही जुंपण्यात आले आहेत. प्रमुख मार्गावर बॅरिकेड्स उभारून तपासणी करण्यात येणार आहे, असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.
शहरातील प्रत्येक अधिकारी मंगळवारी रात्री गस्तीवर असणार आहे. नशेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. नशेत वाहने चालविणे, मोटारसायकलवर दोनपेक्षा अधिक जणांना घेऊन सुसाट वेगाने मोटारसायकल चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी सर्व तयारी केल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
मध्यरात्री एकपर्यंत जल्लोषाला मुभा आहे. त्याआधीच प्रत्येकाने घर गाठावे. एकनंतर अनावश्यकपणे रस्त्यावर फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचेही यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी सांगितले. प्रमुख रस्त्यांवरील घडामोडींवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही नजर असणार आहे. नववर्षाचे स्वागत करताना अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी घेण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.









