गंभीर अवस्थेतील गर्भवतीला हुबळीला हलवण्याची वेळ, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या लोकार्पणाची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
गंभीर जखमी स्थितीतील एका गर्भवतीला प्रसूतीसाठी सिव्हिलमधील प्रसूती विभागात सोमवार दि. 30 रोजी पहाटे चारच्या दरम्यान दाखल करण्यात आले. पण तिच्या गर्भातच बाळाचा मृत्यू झाल्याने बेशुद्ध अवस्थेत तिला फिट्स येत होते. त्यामुळे कदाचित मेंदूसंबंधी समस्या असावी, या शक्यतेने सकाळी बिम्समधून अधिक उपचारासाठी तिला हुबळी येथील किम्स रुग्णालयात हलवण्यात आले. बिम्समध्ये न्युरोफिजिशियन नसल्याने तिला हुबळीला हलवण्याची वेळ बिम्सवर आल्याने तज्ञ डॉक्टरांची कमतरता बिम्सला भासू लागली आहे.
राधिका मल्लेश गद्दीहोळी (वय 19) रा. मेलमट्टी, ता. गोकाक असे तिचे नाव आहे. राधिकाला प्रसूतीकळा सुरू झाल्याने तिला सुरुवातीला यमकनमर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिची प्रकृती खालावल्याने अधिक उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी अतिदक्षता विभागात ठेवून उपचार करावे लागणार होते. यासाठी अधिक खर्च येणार असल्याचे सांगण्यात आल्याने हा खर्च परवडणारा नसल्याने कुटुंबीयांनी तिला सोमवारी पहाटे चारच्या दरम्यान जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागात दाखल केले. डॉक्टरांनी गर्भवतीच्या सर्व चाचण्या केल्या असता तिच्या गर्भातच बाळाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच ती बेशुद्धावस्थेत होती. बेशुद्ध स्थितीतच फिट्सही येत असल्याने कदाचित तिला मेंदूसंबंधी आजार असावा, या शक्यतेने ऑक्सिजनवरच अॅम्ब्युलन्समधून अधिक उपचारासाठी किम्स रुग्णालयाला हलवण्यात आले. गेल्या महिनाभरात सिव्हिलमधील प्रसूती विभागात बाळंतिणींचा मृत्यू होत असल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच आजही अशाच प्रकारची घटना घडल्याची चर्चा सुरू होती. मात्र, गंभीर स्थितीतील गर्भवतीला अन्यत्र हलवण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. सिव्हिलमध्ये न्युरोफिजिशियन आणि हृदयतज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे यासंबंधी रुग्णांना अन्यत्र जाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळेच प्रसूतीसाठी दाखल झालेल्या या महिलेलाही हुबळी येथील किम्स रुग्णालयात हलवण्यात आले. गंभीर स्थितीतील महिला जीवन-मरणाशी झुंज देत आहे. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी प्रसूती विभागाबाहेर आक्रोश केला. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विठ्ठल शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सिव्हिल आवारात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. मात्र, अद्यापही त्या ठिकाणी मनुष्यबळाला मंजुरी देण्यात आलेली नाही. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झाल्यास त्या ठिकाणी हृदयरोगतज्ञ व न्युरोफिजिशियन डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. पण सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण झालेले नाही.









