वार्ताहर/ किणये
नरवीर तानाजी युवक संघ, किणयेतर्फे निवृत्त जवानांचा सत्कार महालक्ष्मी मंदिराच्या आवारात करण्यात आला. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष यशवंत गुरव होते. प्रारंभी निवृत्त जवानांची ट्रॅक्टरमधून गावात मिरवणूक काढण्यात आली.
ग्रामपंचायत अध्यक्ष हेमंत पाटील, सदस्य माऊती डुकरे, श्रीधर गुरव, अरविंद कीर्तने, वर्षा डुकरे, चौराशी देवी मंदिर कमिटीचे अध्यक्ष कृष्णा गुरव आदींच्या हस्ते दीपप्रजनन करण्यात आले.
शिवप्रतिमेचे पूजन उमेश बाळेकुंद्री यांनी केले. यावेळी मराठी शाळेच्या मुलींनी देशभक्तीपर गीत सादर केले.
चंद्रज्योती देसाई यांनी विशेष भक्तीपर गीत सादर केले. भुजंग कणकुंभकर यांनी ‘ए मेरे वतन के लोगो’ या गीताचे प्रात्यक्षिक करून दाखविले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गावातील 45 निवृत्त जवानांचा सपत्नीक विशेष सत्कार करण्यात आला. निवृत्त जवानांच्यावतीने कृष्णा पाटील यांनी जवानांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. भारतीय जवान सीमेवर राहून देशाचे रक्षण करतात त्यामुळेच आपण सुरक्षित राहतो. अशा निवृत्त जवानांचा सत्कार करणे हे आमचे कर्तव्य आहे. असे यशवंत गुरव यांनी भाषणातून सांगितले. रामलिंग गुरव यांनी आभार मानले. यावेळी गावातील खेळाडू, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









