वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाकडून हेतुपुरस्सर दिल्लीच्या मतदारसूचींमध्ये फेरफार केले जात आहेत, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. या पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी त्यांच्या पत्नीचे नाव गायब करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तर संजय सिंग यांच्या पत्नीचे नाव त्यांनी बेकायदेशीररित्या मतदार सूचीत घुसविले होते, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक आता जवळ येत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात ती होण्याची शक्यता असून जानेवारीच्या उत्तरार्धात या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग दिल्लीची मतदारसूची अद्यायावत करण्याच्या कामात गुंतला आहे. नव्या मतदारांची नावे समाविष्ट करणे आणि अवैध नावे किंवा अन्य कारणांमुळे अपात्र असणाऱ्या मतदारांची नावे वगळण्याचे काम पेले जात आहे. त्यामुळे राजकीय वादंग माजविण्यात येत आहे.
पत्नीचे नाव नसल्याचा आरोप
आपल्या पत्नीचे नाव सूचीतून काढल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी केला आहे. मात्र, त्यांची पत्नी दिल्लीची मतदारच नसल्याचे म्हणणे भारतीय जनता पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान कक्षाचे प्रमुख अमित मालवीय यांनी मांडले आहे. संजय सिंग यांच्या पत्नी अनिता सिंग या उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील मतदार आहेत. पण त्यांनी आजवर दिल्लीतच मतदान केले आहे. त्यांची नावे दोन्हीकडच्या मतदारसूचींमध्ये आहेत. त्यामुळे आता मतदारसूचींची छाननी केल्यानंतर त्यांचे नाव दिल्लीच्या सूचीतून काढण्यात आल्याचे प्रतिपादन मालवीय यांनी केले. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यार्थ त्यांनी काही छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत. अनिता सिंग यांच्या स्वत:च्या प्रतिज्ञापत्रानुसार त्या सुलतानपूर येथील मतदार आहेत. ही बाब खरी असेल तर दिल्लीत त्यांनी आतापर्यंत केलेले सर्व मतदान बेकायदेशीर आहे, असे मालवीय यांचे म्हणणे आहे.
आम आदमी पक्षाचा आरोप
निवडणूक आयोगाला वेठीस धरुन भारतीय जनता पक्ष पूर्वांचली मतदारांची नावे दिल्लीच्या सूचीतून काढून टाकत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचा आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हजारो मतदारांच्या नावांवर आक्षेप घेत असून या नावांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करीत आहेत. आयोग त्यांच्यावर विश्वास ठेवत आह। असेही प्रतिपादन आम आदमी पक्षाकडून केले जात आहे.
आयोगाचे स्पष्टीकरण
कोणाचेही नाव अवैधरित्या काढण्यात आलेले नाही. ज्या मतदारांची नावे दोन्हीकडच्या मतदारसूचींमध्ये आहेत, त्यांचीच नावे वगळण्यात येत असून तसे करण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे. असे स्पष्टीकरण काही दिवसांपूर्वी आयोगाने दिले होते. मतदार सूचीमध्ये नवी नावे समाविष्ट करणे आणि अवैध नावे वगळणे ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे आणि नियमांच्या अनुसारच होत आहे, असे आयोगाने आरोपांना उत्तर देतांना स्पष्ट केले आहे.









