कोल्हापूरः
आजरा शहरापासून जवळच असलेल्या चित्री नदीवरील परोली बंधाऱ्यात बुडून अॅड. रूजाय कुतीनो (वय 48), फिलीप कुतीनो (वय 40) या दोन सख्ख्या भावांसह लॉईड कुतीनो (वय 35, सर्व रा. आजरा) या तिघांचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला. घटनास्थळी कुतीनो कुटुंबीय व नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. तर या दुर्दैवी घटनेमुळे कुतीनो कुटुंबिय वास्तव्यास असलेल्या आजरा शहरातील ख्रिश्चन गल्ली व सोमवार पेठेवर शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, पुणे येथे नोकरीनिमित्त असलेले फिलीप हे नाताळ सणासाठी पत्नी, मुलांसह आजरा येथे आले होते. तर
मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीला असलेले लॉईड 13 डिसेंबर रोजी एक महिन्याच्या सुट्टीवर आले होते. नाताळ सणाच्या निमित्ताने सर्व कुतीनो कुटुंबिय एकत्र होते. रविवारी रूजाय यांच्या मामाच्या मुलाच्या साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यानंतर कुतीनो बंधू पोहण्यासाठी चित्री नदीवरील परोली बंधाऱ्याकडे मुलाबाळांसह गेले होते. काही वेळ पोहल्यानंतर फिलीप व रूजाय बंधाऱ्यामध्ये असलेल्या जॅकवेलवरून उडी मारून पोहण्यासाठी गेले. मात्र यामध्ये फिलीप बराचवेळ वर न आल्याने अॅड.रूजाय यांनी भाऊ कोठे आला नाही हे पाहण्यासाठी त्याच ठिकाणी उडी घेतली. पण रूजायही खालीच अडकले. या दोघांच्या शोधासाठी गेलेले लॉईड देखील याच गाळात रूतल्याने तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान कुतीनो बंधूंच्या विकी नावाच्या नातेवाईकानेही या तिघांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र लॉईड यांचे केस त्यांच्या हातातून सटकल्यामुळे विकी सुरक्षितपणे तेथून बाहेर पडले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कुतीनो बंधूंच्या आतेभावाने विकी यांना माघारी बोलावले यामुळे विकी यांचा जीव वाचल्याचीही चर्चा घटनास्थळी सुरू होती. या घटनेची माहिती मिळताच आजरा शहरासह पंचक्रोशीतील नागरीकांनी परोली बंधारा परीसरात गर्दी केली होती.
बंधाऱ्यामध्ये पाणी अडविले असल्यामुळे बंधारा तुडूंब भरला आहे. त्यामुळे शोध कार्यात अडथळे आले. पाटबंधारे विभागाचे सहकार्य घेऊन ग्रामस्थांनी या मृतदेहांचा शोध सुरू केला, अथक प्रयत्नानंतर सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास गाळात रूतलेले मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मृतदेह बाहेर काढताच कुतीनो कुटुंबिय आणि रूजाय व फिलीप यांच्या मुलांनी केलेला आक्रोश उपस्थितांनाही गहीवरून टाकणारा होता. मृतदेह ग्रामीण रूग्णालयात आणल्यानंतर याठिकाणी शहरातील नागरीकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. तीनही मृतदेहांवर सोमवारी दुपारी 2 वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहेत.
गाळात रूतल्याने मृत्यू
तिघेही पट्टीचे पोहणारे होते, मात्र गाळात रूतल्यामुळे त्यांना बाहेर येता आले नाही, त्यामुळेच मृत्यू झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. अॅड. रूजाय यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, फिलीप यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. तर लॉईड यांचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व 16 महिन्यांची एक मुलगी असा परिवार आहे.








