प्रवेश परीक्षेचे आयोजन : कवटगीमठ यांची माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने केएलई संस्थेने मोफत प्रवेश व शिष्यवृत्तीसाठी परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 5 जानेवारी, 19 जानेवारी व 6 एप्रिलदरम्यान परीक्षा होणार आहेत. विद्यार्थ्यांना पीयूसी अभ्यासक्रमासोबत सीईटी, जेईई, नीट या परीक्षांची परिपूर्ण माहिती मिळण्यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती केएलई संस्थेचे संचालक महांतेश कवटगीमठ यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मागील वर्षी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना 80 लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. यावर्षी 1 कोटीहून अधिक रकमेच्या शिष्यवृत्ती दिल्या जाणार आहेत. शिष्यवृत्ती परीक्षा मोफत असून नोंदणी न करता थेट येणाऱ्यांना परीक्षेला बसण्याची मुभा दिली जाणार आहे. मोठ्या महानगरांपेक्षा केएलई कॉलेजची फी खूपच कमी आहे. दहावी परीक्षेत उत्तम गुण घेतलेल्या मोजक्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.
दहावीमध्ये 97 टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतलेल्या 25 विद्यार्थ्यांना फीमध्ये 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. केएलई इंटीग्रेटेड कॉलेजमध्ये नीट, जेईई अकॅडमी सुरू करण्यात आली आहे. दर्जेदार प्राध्यापक या ठिकाणी शिक्षण देत आहेत. विद्यार्थ्यांनी केएलईच्या सर्व शिष्यवृत्तींचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी कॉलेजशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी संस्थेचे संचालक जयानंद मुनवळ्ळी, एस. जी. नंजण्णावर, डॉ. सतीश एम. पी., मल्लिकार्जुन एम., वेणुगोपाल रे•ाr यांच्यासह इतर उपस्थित होते.









