आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे निवेदन
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
सर्वोच्च मानांकित बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने स्पर्धेत खेळण्यासाठी आल्यावेळी परिधान केलेली जीन्स बदलण्यास नकार दिल्यानंतर जागतिक जलद आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा सोडली, असे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने म्हटले आहे.
महासंघाने निवेदनात म्हटले आहे की त्यांच्या नियमांमध्ये ड्रेस कोडचा समावेश आहे, जो सहभागी होणाऱ्यांना जीन्स परिधान करण्यापासून प्रतिबंधित करतो. मुख्य आर्बिटरने कार्लसनला उल्लंघनाची माहिती देऊन 200 डॉलर्सचा दंड ठोठावला आणि त्याला आपला पोशाख बदलण्याची विनंती केली, असे महासंघाने आपल्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे. दुर्दैवाने कार्लसनने नकार दिला आणि परिणामी त्याला नवव्या फेरीत समाविष्ट केले गेले नाही. हा निर्णय नि:पक्षपातीपणे घेण्यात आला आणि सर्व खेळाडूंना हा नियम समानपणे लागू होतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, 34 वर्षीय नॉर्वेजियन बुद्धिबळ ग्रँडमास्टरने त्याच्या ‘टेक टेक टेक चेस’ अॅपवरील व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट केला आहे. आपण 200 डॉलर्सचा दंड स्वीकारला, पण न्यूयॉर्कमधील स्पर्धेतून बाहेर पडण्यापूर्वी पँट बदलण्यास नकार दिला, असे त्याने त्यात म्हटले आहे. ‘मी त्यांना म्हणालो की, जर चालत असेल, तर मी उद्या बदलेन. पण ते म्हणाले तुला आताच पोशाख बदलावा लागेल. त्या क्षणी माझ्यासाठी तो काहीसा तत्त्वाचा विषय झाला’, असेही कार्लसनने पुढे म्हटले आहे.









