982 अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षित : 1 जानेवारीपासून पाठवणार डेटा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’च्या पार्कर सोलर प्रोब अंतराळयानाने नुकताच सूर्याच्या अत्यंत जवळ पोहोचण्याचा विक्रम केला. नासाचे हे यान सूर्यापासून सुमारे 61 लाख किमी अंतरापर्यंत पोहोचले होते. असा विक्रम करणारे हे जगातील पहिले वाहन आहे. आता पुढील टप्प्यात पार्कर सोलर प्रोब अंतराळयान 1 जानेवारीपासून त्याच्या स्थिती आणि शोधांचा तपशीलवार डेटा पाठवेल. सूर्याजवळून जात असताना अंतराळयानाचा वेग ताशी 6.9 लाख किमीपेक्षा जास्त होता. त्यावेळी हे वाहन 982 अंश सेल्सिअसच्या उष्णतेचा सामना करत होते. एवढी तीव्र उष्णता असूनही अंतराळयानाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. ते पूर्णपणे सुरक्षित आहे.
27 डिसेंबरला सिग्नल पाठवला
नासाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पार्कर सोलर प्रोबने 27 डिसेंबर रोजी पृथ्वीवरील नासाच्या जॉन्स हॉपकिन्स अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरी टीमला एक सिग्नल पाठवला. या सिग्नलिंगमुळे शास्त्रज्ञांना यान सुरक्षित असून योग्यरित्या काम सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. नासाच्या या मोहिमेचा उद्देश सूर्याविषयी अधिक माहिती गोळा करणे हा आहे. सूर्याच्या बाह्या वातावरणात अंतराळयानाच्या प्रवेशामुळे शास्त्रज्ञांना सूर्याबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत होणार आहे.









