कळंगूटची पुनरावृत्ती होण्याची वाट पाहू नका : संबंधित खाते लक्ष देईल का ?
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात मोठ्याप्रमाणात देश-विदेशी पर्यटक आले असून, जलसफरीचा धंदा सध्या जोरात सुऊ आहे. जलसफरीच्या तिकीट पर्यटकांना विकण्यासाठी दलाल रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. मात्र हा व्यवसाय योग्यरितीने चालतो काय की केवळ पैशांच्या आशेपायी पर्यटकांच्या जीवाकडे खेळ केला जात आहे. याचा तपास होणे गरजेचे आहे. अन्यथा कळंगूटची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही.
समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना फेरीबोटीतून जलसफरीसाठी नेले जाते. मात्र कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. एकाद्यावेळी बोट बुडून दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मिरामार समुद्रकिनाऱ्यावर बोटीतून पर्यटकांना जलसफरीसाठी नेत असताना पर्यटकांना लाईफजॅकेट दिले जात नाही. तशाच स्थितीत पर्यटकांना बोटीत भरले जाते. संबंधित खाते या गोष्टीकडे लक्ष देईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गेल्या 25 डिसेंबर रोजी नाताळाच्या दिवशी कळंगूट येथे पर्यटकांना घेऊन जलसफरीसाठी गेलेली बोट बुडून 25 पर्यटक बुडाले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. मिरामार येथे सुऊ असलेला प्रकार पाहिल्यास सरकार आणखीन एकदा बोट बुडून काहींचा मृत्यू होण्याची वाट पाहत आहे की काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. पैशांच्या आशेपोटी पर्यटकांना बोटीत कोंबले जातात. त्यांना लाईफजॅकेट नाही किंवा कोणती सुरक्षाही दिली जात नाही. एखादी दुर्घटना घडल्यास पुढे काय होईल, असा भयानक प्रश्न निर्माण होत आहे. संभाव्य दुर्घटना होण्यापूर्वी संबंधित खात्याने या गैरप्रकाराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.









