डॉ. किरण ठाकुर : जीएसएस कॉलेजमध्ये स्नेहमेळावा उत्साहात
प्रतिनिधी/ बेळगाव
राष्ट्रासाठी समर्पित भावनेने जेथे असू तेथे प्रामाणिकपणे काम करणे ही राष्ट्रभक्ती होय. एसकेई सोसायटीच्या जीएसएस व अन्य शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी ही राष्ट्रभक्ती निरंतर जोपासावी व आपल्या कॉलेजचे, प्राध्यापकांचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा एसकेई सोसायटीचे चेअरमन व ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांनी व्यक्त केली.
एसकेई सोसायटीच्या जीएसएस कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवार दि. 28 रोजी कॉलेजच्या पु. ल. देशपांडे खुल्या सभागृहामध्ये पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर डॉ. किरण ठाकुर बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते प्रसाद पंडित, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. भरत तोपिनकट्टी, स्नेहमेळावा समितीचे चेअरमन कुलदीप हंगिरगेकर, प्राचार्य अरविंद हलगेकर उपस्थित होते.
किरण ठाकुर म्हणाले, भारताची लोकसंख्या सर्वाधिक आहे. ही लोकसंख्या सुशिक्षितांची व सुसंस्कृतांची असेल तर आपण जगावर राज्य करू. आपल्यापैकी प्रत्येकाने किमान तीन निरक्षरांना साक्षर करून शिक्षण देण्याचा संकल्प केला तर 2050 पर्यंत संपूर्ण देश सुशिक्षित होईल. त्यादृष्टीने आपल्या प्रत्येकाची वाटचाल असायला हवी.
ही संस्था व कॉलेज उभारण्यामध्ये माझे वडील बाबुराव ठाकुर, डॉ. वाय. के. प्रभू, जी. व्ही. हेरेकर, व्ही. व्ही. हेरवाडकर, आण्णासाहेब लठ्ठे व अनेकांचे प्रयत्न कारणीभूत आहेत. आज कॉलेजचे जे कार्यालय आहे, तो जमखंडीकरांचा समर पॅलेस होता. त्याचे नूतनीकरण केले जाईल. येथे संग्रहालय उभारण्यात येणार असून आपले माजी विद्यार्थी कोणत्या पदावर काय काम करत आहेत याची माहिती घेऊन ती सादर केली जाईल. या ठिकाणी कायमस्वरुपी शामियाना उभारण्यात येईल. या सर्व उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांनीसुद्धा आर्थिक हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.
आम्हाला परीक्षार्थी शिक्षण बंद करावयाचे आहे. कौशल्यावर आधारित शिक्षण देऊन कोणीही बेरोजगार राहणार नाही, यासाठी आपला प्रयत्न आहे. या सर्व संकल्पपूर्तीसाठी विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रसाद पंडित यांनी श्रुती, स्मृती, चिंतन, मनन व अभ्यास ही पंचसूत्री जोपासावी. माणसाने डोक्याने विद्वान असावे पण मनाने लहान असावे, असे सांगून शिक्षणाचे कार्य करणारे शिक्षक महत्त्वाचे असून शिक्षणाचा जीवनात आपण किती खुबीने उपयोग करतो यावर यश अवलंबून असल्याचे सांगितले.
प्रारंभी माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष अनंत लाड यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल माहिती दिल्यानंतर दोन मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुकुंद गोरे यांनी स्वागत गीत सादर केले. कुलदीप हंगिरगेकर यांनी स्वागत केले. प्राचार्य अरविंद हलगेकर यांनी प्रास्ताविक केले. अनंत लाड, डॉ. संदीप देशपांडे, एस. के. पाटील, अनिल खांडेकर व तृप्ती घोरपडे यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी संघटनेतर्फे सर्व माजी प्राचार्यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन डॉ. कीर्ती फडके यांनी केले. प्रा. भरत तोपिनकट्टी यांनी आभार मानले.









