वृत्तसंस्था / बुलावायो
यजमान झिम्बाब्वे आणि अफगाण यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी अफगाणने पहिल्या डावात 2 बाद 372 धावा जमवित झिम्बाब्वेला चौख प्रत्युत्तर दिले. तत्पूर्वी झिम्बाब्वेने पहिल्या डावात 586 धावा जमविल्या होत्या.
बुलावायोची खेळपट्टी फलंदाजी अनकुल असून या कसोटीत तीन दिवसांमध्ये जवळपास 900 धावा नेंदविल्या गेल्या. अफगाणने 2 बाद 95 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. पण दिवसभरात झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना अफगाणची नाबाद राहिलेली जोडी फोडता आली नाही. रेहमत शहा आणि कर्णधार हसमत्तुल्ला शाहिदी यांनी तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 308 धावांची त्रिशतकी भागिदारी केली. रेहमत शहा दिवसअखेर 370 चेंडूत 2 षटकार आणि 20 चौकारांसह 199 धावांवर तर शाहिदी 238 चेंडूत 15 चौकारांसह 121 धावांवर खेळत आहे. अफगाणचा संघ अद्याप 214 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 8 गडी खेळावयाचे आहेत. शहाने 198 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह तर शाहिदीने 201 चेंडूत 14 चौकारांसह शतक झळकविले. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी त्रिशतकी भागिदारी 511 चेंडूत नोंदविली.
संक्षिप्त धावफलक : झिम्बाब्वे प. डाव 135.2 षटकात सर्वबाद 586, अफगाण प. डावल 111 षटकात 2 बाद 372 (रेहमत शहा खेळत आहे 199, शाहिदी खेळत आहे 121, अब्दुल मलीक 23, अटल 3, अवांतर 26, मुझारबनी आणि गेवांदु प्रत्येकी 1 बळी)









