हजार रुपयांचा दंड वसूल : स्वच्छता न ठेवणाऱ्या हॉटेल चालकांचे धाबे दणाणले
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्या आरोग्य खात्याने शहरातील सात हॉटेल्सवर कारवाई करून 70 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. शुक्रवार दि. 27 रोजी मध्यवर्ती बसस्थानक परिसर आणि महात्मा फुले रोडवरील हॉटेल्सवर ही कारवाई करण्यात आली आहे. आरोग्य खात्याने केलेल्या या कारवाईमुळे हॉटेलमध्ये स्वच्छता न ठेवणाऱ्या हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत.
महापालिकेकडून शहर आणि उपनगरांतील हॉटेल्सची वारंवार तपासणी केली जाते. विशेषकरून हॉटेलच्या स्वयंपाकखोलीत स्वच्छता ठेवण्यात आली आहे की नाही याची पाहणी केली जाते. अलीकडेच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील 80 हॉटेल्समधील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात आली होती. त्यानंतर आता आरोग्य खात्याकडून विविध हॉटेल्सना भेटी देऊन हॉटेलमध्ये स्वच्छता ठेवण्यात येत आहे की नाही? याची पाहणी केली जात आहे.
महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्या उपस्थितीत आरोग्य खात्याचे अधिकारी व कर्मचारी हॉटेल्सची पाहणी करत आहेत. शुक्रवारी मध्यवर्ती बसस्थानक परिसर आणि महात्मा फुले रोडवरील काही हॉटेल्समध्ये तपासणी करण्यात आली. त्यावेळी 7 हॉटेलमध्ये स्वच्छता ठेवण्यात आली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे हॉटेल्सवर कारवाई करून 70 हजार ऊपयांचा दंड वसूल केला आहे.









