वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, सुरेश रैना, इरफान पठाण आणि शिखर धवन यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून भारतीय अर्थव्यवस्थेतील त्यांच्या योगदानाचे तसेच दूरदर्शी नेतृत्वाचे कौतुक केले आहे. तेंडुलकरने डॉ. सिंग यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली असून त्यांचे योगदान सदैव स्मरणात ठेवले जाईल, असे म्हटले आहे.
‘एक्स’वरील पोस्टमध्ये गंभीरने म्हटले आहे की, डॉ. मनमोहन सिंग हे खरोखरच वेगळ्या प्रकारचे होते. विशेषत: आपल्या देशाला आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान भविष्यातील पिढ्यांकडून अभ्यासले जाईल. शिखर धवनने म्हटले आहे की, या माजी पंतप्रधानांची उणीव भासणार आहे, आपल्या पोस्टमध्ये त्याने डॉ. सिंग यांना दूरदर्शी नेताही म्हटले आहे. इरफान पठाणने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत आणि भारतीय अर्थव्यवस्था सदैव ऋणी राहील, असे नमूद केले आहे.









