इर्व्हिनचे अर्धशतक, झिम्बाब्वे 4 बाद 363
वृत्तसंस्था / बुलावायो
गुरुवारपासून येथे सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत दिवसअखेर यजमान झिम्बाब्वेने अफगाण विरुद्ध पहिल्या डावात 4 बाद 363 धावा जमविल्या. सिन विलियम्सने नाबाद शतक (145) तर कर्णधार इर्व्हिनने नाबाद अर्धशतक (56) झळकविले.
या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. करेन आणि गुंबे या सलामीच्या जोडीने 43 धावांची भागिदारी केली. अफगाणच्या नावेद झेद्रानने गुंबेला 9 धावांवर बाद केले. बेनकरेन आणि कैटानो या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 49 धावांची भर घातली. अफगाणच्या झहीर खानने कैटानोला झेलबाद केले. त्याने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 46 धावा जमविल्या. करेन आणि सिन विलियम्स यांनी संघाचा डाव सावरताना तिसऱ्या गड्यासाठी 87 धावांची भागिदारी केली. करेनने 74 चेंडूत 11 चौकारांसह 68 धावा झळकविल्या.
विलियम्सने दमदार शतक झळकविताना कर्णधार इर्व्हिन समवेत पाचव्या गड्यासाठी अभेद्य 143 धावांची भागिदारी केली. विलियम्सने आपले शतक 115 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने झळकविले. इर्व्हिनने अर्धशतक 80 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. तत्पूर्वी विलियम्सने मेयर्स समवेत चौथ्या गड्यासाठी 50 धावांची भागिदारी केली. मेयर्सने 38 चेंडूत 3 चौकारांसह 27 धावा जमविल्या. दिवसअखेर विलियम्स 3 षटकार आणि 9 चौकारांसह 145 तर इर्व्हिन 6 चौकारांसह 56 धावांवर खेळत आहे. अफगाणतर्फे गझनफरने 2 तर नावेद झेद्रान आणि झहीर खान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: झिम्बाब्वे प. डाव 85 षटकात 4 बाद 363 (सिन विलियम्स खेळत आहे 145, इर्व्हिन खेळत आहे 56, करन 68, कैटानो 46, मेयर्स 27, अवांतर 12, झेद्रान 1-64, झहीर खान 1-88, गझनफर 2-83)









