इचलकरंजी :
येथील आझाद गल्ली परिसरात कौटुंबिक वादातून जावयाने सास्रयाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली. या प्रकरणात जावेद बाबू लाटकर (वय 42, रा. आझाद गल्ली, तीन बत्ती चौक परिसर) यांचा मृत्यू झाला असून, संशयित जावई सिकंदर मोहम्मद अली शेख व त्याचे साथीदार घटनास्थळावर दुचाकी टाकून पसार झाले आहेत. याबाबतची नोंद करण्याचे काम शिवाजीनगर पोलिसात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संशयित सिकंदर शेख याने लाटकर यांच्या मुलीशी विवाह केला होता. मात्र, लग्नानंतर काही महिन्यांतच वादामुळे पत्नी माहेरी राहू लागली. तिला परत नेण्यासाठी शेख याचे सासरच्या मंडळींशी वारंवार वाद होत होते. बुधवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास शेख आपल्या साथीदारांसह सास्रयाच्या घराबाहेर येऊन वाद घालू लागला. सासरे लाटकर यांनी विचारणा करताच शेख याने त्यांच्यावर हल्ला केला. लाटकर यांना घराबाहेर ढकलत नेत गटारीजवळ खाली पाडून खाली पडलेल्या दगडाने त्यांच्या डोक्यावर वार केले. वारंवार मारल्याने घटनास्थळीच लाटकर यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर संतप्त जमावाने शेख याची दुचाकी फोडली तसेच त्याच्या घराजवळ दगडफेक केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, लाटकर यांना आयजीएम रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिक्रायांनी त्यांना मृत घोषित केले. शिवाजीनगर पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे.








