कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षण हक्क कायद्यात बदल करीत पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करून पुढे ढकलू नये, असा निर्णय जाहीर केला आहे. परंतू यापुर्वीच महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घेवून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. आता केंद्र सरकारच्या निर्णयाने आणखी बळकटी मिळेल. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 3 हजार 16 शाळांमधील सुमारे 1 लाख 11 हजार 57 विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची पडताळणी होणार आहे. केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रासह पालकांकडून स्वागत केले जात आहे.
पाचवी ते आठवीपर्यंत कोणालाही नापास न करता सरसकट पास करण्याचा निर्णय शासनाने 2012 ते 13 दरम्यान घेतला होता. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जात होते. तर खासगी शाळा गुणवत्ता वाडीसाठी पुर्वीपासूनच नापास विद्यार्थ्यांना पास न करता सुधारण्याची मुभा देत होते. आता केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयामुळे अभ्यास केला नाही तर आपण पास होणार नाही याची खात्री होईल. परिणामी अभ्यासात कच्चे असलेले विद्यार्थी जास्त मेहनत घेवून अभ्यास करतील. तसेच विषय शिक्षक व पालक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देवून अभ्यास घेतील. अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही, ही भावना वाढीस लागून विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागेल. यातून विद्यार्थ्यांसह शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढेल. तसेच विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकास होण्यास हा निर्णय दिशादर्शक ठरणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार शासनाने घेतलेल्या निर्णयाने विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याची क्षमता वाढेल. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती, कौशल्य विकास वाढीसाठी शिक्षण तज्ञांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. परिणामी शाळांकडून विद्यार्थी वाढीसाठी दिला जाणाऱ्या गुणांच्या फुगवट्याला आळा बसणार आहे. पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परिक्षेत नापास केले तर दहावीच्या निकालात ते सहजरित्या पास होतील. तसेच पटसंख्या वाढीसाठी काही खासगी शाळा पुर्वीच्या निर्णयाचा फायदा घेवून निकाल चांगला असल्याचे दाखवत होते. परंतू पुढे जाऊन दहावी–बारावीनंतर विद्यार्थ्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागत होता. परंतू आता या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारल्याने शैक्षणिक प्रगतीचा आलेख आपोआपच उंचावणार आहे. कारण पाचवी ते आठवी हा दहावी बारावीचा पायाच मानला जातो. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्नशील राहावे लागणार आहे. तर विद्यार्थ्यांच्या अधोगतीला शिक्षकांना जबाबदार धरले जाईल. त्यामुळे अध्यापन आणि अध्ययन यामध्ये शाश्वत विकास होणार हे निश्चित.
जिल्ह्यातील शाळा व विद्यार्थी संख्या
शाळा इयत्ता शाळा विद्यार्थी
जि. प. 5 वी 1933 53688
जि. प. 8 वी 1082 57133
नवोदय 8 वी 1 236
पालकांमध्ये जागरूकता येणार
पाचवी ते आठवीपर्यंत नापास करीत नाहीत म्हणून पालक बेफिकीर राहायचे. परंतू दहावीच्या वार्षिक परीक्षेवेळी आपल्या पाल्याची अभ्यासातील अधोगती पाहून पालकांना खूप वाईट वाटायचे. त्यामुळे खासगी शिकवण्या लावून पाल्याला सुधारण्याचा प्रयत्न होत होता परंतू या निर्णयामुळे पालकांमध्ये अभ्यासाविषयी जनजागृती होवून पाचवीपासूनच पाल्याच्या अभ्यासाकडे लक्ष देतील, असे शिक्षण तज्ञांचे मत आहे.
शैक्षणिक क्षमता वाढीसाठी योग्य निर्णय
पाचवी ते आठवीपर्यंतच्या ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास कच्चा आहे. त्या विद्यार्थ्यांकडे जास्त लक्ष देवू शिक्षकांना शिकवावे लागणार आहे. कारण आता विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षमता वाढवण्यासाठी अधिक तयारी करावी लागणार आहे. यापुर्वीच राज्य शासनाने हा निर्णय जाहीर केला होता. आता केंद्र सरकारने निर्णय घेवून बळकटी दिली आहे.
महेश चोथे (शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर)








