प्रतिनिधी/ बेळगाव
हलगा-मच्छे बायपासचे काम स्थगित ठेवून दहा दिवस उलटले असले तरीही ठेकेदाराकडून मात्र कामाच्या ठिकाणी यंत्रसामग्री व कर्मचारी थांबवून ठेवण्यात आले आहेत. पण न्यायालयाचा निकाल येईपर्यंत न्यायप्रविष्ट जमिनीतून रस्त्याचे काम करू देणार नाही, या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत.
पिकाऊ शेतजमिनीतून रस्ताकामासाठी जमीन देणार नाही, अशा भूमिकेवर शेतकरी ठाम असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून शेतकऱ्यांचा विरोध डावलत रस्त्याचे काम केले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा लढा न्यायप्रविष्ट आहे. उच्च न्यायालयाने त्याचबरोबर स्थानिक न्यायालयानेही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला फटकारले आहे. शेतकऱ्यांकडूनही वारंवार बायपासच्या कामाला विरोध केला जात आहे. बायपास विरोधातील मुख्य दाव्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत रस्त्याचा वापर करू नये, असा अर्ज सातवे अतिरिक्त दिवाणी न्यायालयाने फेटाळला असला तरी शेतकऱ्यांनी वरिष्ठ दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बळ मिळाले असून न्यायप्रविष्ट जागेतून बायपासचे काम करण्यात येऊ नये, अशी मागणी करत सोमवार दि. 15 डिसेंबर रोजी ठेकेदाराला बायपासचे काम बंद करण्यास सांगण्यात आले होते. तेव्हापासून दहा दिवस झाले बायपासचे काम बंद ठेवण्यात आले आहे.
बायपासचे काम सुरू करण्यासाठी ठेकेदारांचे प्रयत्न सुरू आहेत. पण यासाठी पोलीस बंदोबस्ताची गरज असल्याने ठेकेदाराकडून पोलिसांची गाठभेट घेण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र, सरकारच्या हिवाळी अधिवेशनानंतर आता काँग्रेसचे अधिवेशन होणार आहे. त्यानंतर एका खासगी कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बेळगावला येणार असल्याने पोलीस यंत्रणा बंदोबस्तात व्यस्त आहे. त्यामुळे सध्या बायपासचे काम सुरू होण्याची शक्यता कमी आहे.









