श्री रंभापुरी जगद्गुरु डॉ. वीरसोमेश्वर स्वामीजींचे प्रतिपादन : मठाधीशांची उपस्थिती
प्रतिनिधी/ बेळगाव
मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी व सध्या अशांततेने त्रस्त असलेल्या जगाला धर्ममार्गाच्या अनुसरणामुळेच शांतता लाभणार आहे. यासाठी आदर्श धार्मिक मूल्यांचे प्रत्येकाने पालन करण्याची गरज आहे. सत्य, शुद्ध धर्म आचरणामुळे जीवनाचाही विकास होतो, असे बाळेहोन्नूर येथील श्री रंभापुरी जगद्गुरु डॉ. वीरसोमेश्वर स्वामीजींनी सांगितले.
मुत्नाळ, ता. बेळगाव येथील हिरेमठात कै. श्री केदार शांतलिंग जगद्गुरुंच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या धर्मजागृती समारंभात बोलताना डॉ. वीरसोमेश्वर स्वामीजी पुढे म्हणाले, सकल जीवात्मांचे भले चिंतणाऱ्या वीरशैव धर्मात आदर्श मूल्ये आहेत. धर्माचरणाबरोबरच सहिष्णू मनोभावामुळे समाजस्वास्थ्य राखता येणार आहे.
केदार जगद्गुरु भीमाशंकर स्वामीजींच्या सानिध्यात हा कार्यक्रम झाला. यावेळी केदार जगद्गुरु म्हणाले, प्रत्येक माणसाने तीन ऋण फेडली पाहिजेत. आई, वडिलांचे ऋण व गुरुंचे ऋण फेडणे गरजेचे असते. मुत्नाळ हे गाव छोटे असले तरी येथील भाविकांच्या मनात भक्ती मोठी आहे. कै. केदार शांतलिंग जगद्गुरुंची मूर्ती प्रतिष्ठापना झाली आहे. केदार व रंभापुरी पीठामधील आत्मियता किती आहे, हे यावरून अधोरेखित होते.
माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, मुत्नाळ हिरेमठाचे शिवानंद शिवाचार्य स्वामीजी, सुळ्ळ शिवसिद्धरामेश्वर स्वामीजी, शिरकोळचे गुरुसिद्धेश्वर स्वामीजी, हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांच्यासह अनेक मठाधीशांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता.
केदार व रंभापुरी जगद्गुरुंची गावातून मिरवणूक काढण्यात आली. कला पथके, डोक्यावर कलश घेतलेल्या महिला, भजनी मंडळे आदींनी या कार्यक्रमात भाग घेतला होता.









