वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माहेश्वरी चौहान व अनंतजीत सिंग नरुका यांनी राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये मिश्र सांघिक स्कीट नेमबाजीत सुवर्ण मिळवित वर्षाची सांगता केली. महिलांच्या वैयक्तिक स्कीटमध्ये गनेमत सेखाँने तर पुरुष विभागात भवतेग सिंगने सुवर्ण मिळविले.
येथील डॉ. कर्नी सिंग शूटिंग रेंजवर झालेल्या स्पर्धेत या जोडीने अतिशय चुरशीच्या झालेल्या अंतिम फेरीत मैराज अहमद खान व अरीबा खा या उत्तरप्रदेशच्या जोडीवर 44-43 असा निसटता विजय मिळविला. पंजाबच्या गनेमत सेखाँ व अभय सिंग सेखाँ यांनी कांस्यपदक मिळविले. त्याआधी 25 शॉट्सच्या तीन फेऱ्यांत माहेश्वरी व अनंतजीत यांनी 72 व 71 गुण नोंदवत सुवर्णपदकाच्या दिशेने वाटचाल केली होती. सात संघांच्या पात्रता फेरीत त्यांनी आघाडीचे स्थान मिळविले होते. मैराज व अरीबा यांच्याशिवाय गनेमत व अभय आणि हरियाणच्या इशान लिब्रा व रायझा धिल्लाँ या तीन जोड्यांनी समान 141 गुण मिळविले होते. शूटऑफमध्ये मैराज व अरीबा यांनी बाजी मारत अंतिम फेरीत स्थान मिळविले होते.
कनिष्ठांच्या मिश्र सांघिक स्कीट नेमबाजीत मध्यप्रदेशने हरियाणाचा पराभव करून सुवर्ण पटकावले. ज्योतिरादित्य सिंग व मानसी रघुवंशी यांनी इशान व संजना सूद यांच्या 4-2 असा शूटऑफमध्ये पराभव करीत जेतेपद पटकावले. 48 टार्गेट्समध्ये दोन्ही जोड्यांनी 40 गुण मिळविले होते. त्यामुळे शूटऑफ घेण्यात आले. तेलंगणाच्या मुनेक बत्तुला व झाहरा दीसावाला यांनी राजस्थानच्या यदुराज सिंग व यशस्वी राठोड यांचा 42-36 असा पराभव करून कांस्यपदक मिळविले.
त्याआधी गनेमत सेखाँने महिलांच्या स्कीट नेमबाजीचे जेतेपद पटकावले. गनेमतने 60 पैकी 50 मध्ये अचूक वेध घेतला तर असीस छिनाने 46 गुण घेत रौप्य आणि ऑलिम्पियन रायझा धिल्लाँने कांस्यपदक मिळविले. वरीष्ठ पुरुषांच्या स्कीट नेमबाजीत पंजाबच्या भवतेग सिंग गिलने 54 गुण घेत पहिल्यांदाच सुवर्ण मळविले. एअर इंडियाच्या फतेहबिर सिंग शेरगिलने रौप्य व मैराज अहमद खानने कांस्यपदक मिळविले.









