प्रतिनिधी/ भेळगाव
कणबर्गी येथील मराठी उच्च प्राथमिक शाळेचे नुकसान करण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून सुरू आहे. शाळेच्या दरवाजांना लावण्यात आलेल्या जाळ्या कापून चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्याचबरोबर यापूर्वी प्रोजेक्टरदेखील लांबविण्यात आला असल्याने कणबर्गी शाळा परिसरात पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी पालकवर्गातून केली जात आहे.
शाळा विद्येचे घर समजले जाते. परंतु भुरट्या चोरांकडून या शाळांनाही टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कणबर्गी मराठी शाळेत समाजकंटकांकडून वारंवार साहित्याची चोरी व नासधूस करण्यात आली. लोखंडी साहित्य, लाकडी साहित्य चोरी केले जात आहे.
काही दिवसांपूर्वीच शाळेतील दरवाजांना जाळी बसविण्यात आली होती. ही जाळी तोडून ती लांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच शाळेच्या हॉलमध्ये काचा टाकण्यात आल्याने विद्यार्थ्यांनाही धोका निर्माण होत आहे.
एसडीएमसी कमिटी, माजी विद्यार्थ्यांना आवाहन करून महागडे साहित्य विद्यार्थ्यांसाठी आणले जात आहे. परंतु समाजकंटकांकडून साहित्य लांबविले जात असल्याने पालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे याठिकाणी पोलिसांनी गस्त घालावी व अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.









