वृत्तसंस्था / पुणे
2024 च्या प्रो कबड्डी लीग हंगामातील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात विद्यमान विजेत्या पुणेरी पलटनने तामिळ थलैवासचा 42-32 अशा 10 गुणांच्या फरकाने पराभव केला.
या सामन्यात विद्यमान विजेत्या पुणेरी पलटन संघातील आर्यवर्धन नवलेने सुपर 10 गुण तर गौरव खत्रीने 5 गुण नोंदविले. सामना सुरू झाल्यानंतर पहिल्या पाच मिनिटांच्या कालावधीत पुणेरी पलटनच्या सचिन आणि नवले यांनी आपल्या चढायांवर संघाला दोन गुण मिळवून दिले. त्यानंतर तामिळ थलैवासच्या अभिषेकने दोन गुण मिळविले. पुणेरी पलटनने त्यानंतर तामिळ थलैवासवर 5-4 अशा एका गुणाची आघाडी घेतली. त्यानंतर व्ही. अजितकुमारने आपल्या दोन चढायांवर गुण वसुल करत पुणेरी पलटनची आघाडी वाढविली. तामिळ थलैवासच्या आक्रमक डावपेचामुळे पुणेरी पलटनचे पहिल्यांदा सर्वगडी बाद झाले. संकेत सावंत आणि हिमांशु यांनी आपल्या संघाला 4 गुणांची आघाडी मिळवून दिली. पुणेरी पलटनने यानंतर सलग गुण वसुल करत पहिल्या 10 मिनिटांतच 20-7 अशी 13 गुणांची आघाडी तामिळ थलैवासवर घेतली. अमनने चालु वर्षीच्या कबड्डी हंगामात आपले वैयक्तिक 50 टॅकल गुण नोंदविले. मध्यंतरावेळी पुणेरी पलटनने तामिळ थलैवासवर 28-13 अशी 15 गुणांची बढत मिळविली होती. दरम्यान सामन्याच्या उत्तराधार्थ तामिळ थलैवासचा खेळ अधिक दर्जेदार झाला. गौरव खत्रीने 5 गुण वसुल केले. यावेळी पुणेरी पलटनने 40 गुणांचा टप्पा ओलांडला होता. अखेर पुणेरी पलटनने तामिळ थलैवासचे आव्हान 10 गुणांच्या फरकाने संपुष्टात आले.









