वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीने पाकमध्ये होणाऱ्या हायब्रिड चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले असून भारताचे सर्व सामने दुबईत खेळविले जातील. 19 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेची सलामीची लढत यजमान पाकिस्तान व न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. भारत व पाक यांच्यातील हायप्रोफाईल लढत 23 फेब्रुवारी रोजी दुबईत घेतली जाईल.
भारताने उपांत्य व अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली तर हे दोन्ही सामनेही दुबईत खेळविले जाणार असल्यावे वृत्तसंस्थेने म्हटले होते. आयसीसी स्पर्धेत नेहमीप्रमाणे भारत व पाक या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांना एकाच गटात ठेवण्यात आले असून गट अ मध्ये त्यांच्यासमवेत न्यूझीलंड व बांगलादेश या संघांचाही समावेश आहे. गट ब मध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड यांचा समावेश आहे.
19 फेब्रुवारी न्यूझीलंड-पाक लढतीने कराचीत या स्पर्धेला सुरुवात होईल तर या स्पर्धेच्या जेतेपदाची लढत 9 मार्च रोजी होईल. 50 षटकांची ही स्पर्धा याआधी 2017 मध्ये ही स्पर्धा खेळविण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण 15 सामने होणार असून त्यापैकी किमान 10 सामने पाकिस्तानमध्ये होतील. पाकमध्ये रावळपिंडी, लाहोर, कराची येथे सामने खेळविले जातील. दुसरा उपांत्य सामना लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर होईल.
‘9 मार्च रोजी लाहोरमध्ये अंतिम सामना होईल. मात्र भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर अंतिम लढत दुबईमध्ये घेण्यात येईल. दोन्ही उपांत्य सामने व अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे,’ असे आयसीसीने निवेदनात सांगितले आहे. भारताची सलामीची लढत बांगलादेशविरुद्ध 20 फेब्रुवारी रोजी झाल्यानंतर 23 रोजी पाकविरुद्ध व शेवटचा गटसाखळी सामना न्यूझीलंडविरुद्ध 2 मार्च रोजी होईल. गट ब मध्ये 21 फेब्रुवारी रोजी अफगाण व दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना कराचीत होईल तर 22 फेब्रुवारी रोजी इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या अॅशेस प्रतिस्पर्ध्यांत लाहोरमध्ये लढत होईल.
गेल्या वर्षी भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये पहिले आठ क्रमांक मिळविणारे संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. पाकमध्ये सामने खेळण्यावरून भारत व पाक यांच्यात वाद निर्माण झाल्याने त्यातून तोडगा काढल्यानंतर आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. या तोडग्यानुसार 2027 पर्यंत आयसीसीच्या भारतात होणाऱ्या स्पर्धांवेळीही पाक संघ त्रयस्थ ठिकाणी खेळणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी गटवारी –
अ गट – पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांगलादेश
ब गट – दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड.
19 फेब्रुवारी – पाकिस्तान वि न्यूझीलंड, कराची
20 फेब्रुवारी – भारत वि बांगलादेश, दुबई
21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान वि दक्षिण आफ्रिका, कराची
22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, लाहोर
23 फेब्रुवारी – पाकिस्तान वि भारत, दुबई
24 फेब्रुवारी – बांगलादेश वि न्यूझीलंड, रावळपिंडी
25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी.
26 फेब्रुवारी – अफगाणिस्तान वि इंग्लंड, लाहोर.
27 फेब्रुवारी – पाकिस्तान वि बांगलादेश, रावळपिंडी.
28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान वि ऑस्ट्रेलिया, लाहोर.
1 मार्च – दक्षिण आफ्रिका वि इंग्लंड, कराची.
2 मार्च – न्यूझीलंड वि भारत, दुबई
4 मार्च – उपांत्य फेरी 1, दुबई
5 मार्च – उपांत्य फेरी 2, लाहोर
9 मार्च – अंतिम सामना, लाहोर/दुबई.









