चंदीगड :
चंदीगड महापालिकेच्या बैठकीदरम्यान मंगळवारी काँग्रेस आणि भाजप नगरसेवकांदरम्यान मोठी झटापट झाली. दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी परस्परांना मारहाण अन् धक्काबुक्की केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावरून हा गोंधळ झाला आहे. महापालिकेच्या बैठकीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी शाह यांच्या विरोधात प्रस्ताव संमत करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर भाजप नगरसेवकांनी नेहरूंच्या काळात काँग्रेसने डॉ. आंबेडकर यांचा अपमान केला होता, असा आरोप केला. यावर काही नगरसेवकांनी अनिल मसीह यांना मतं चोरणारा संबोधिले, तर मसीह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी हे जामिनावर बाहेर असल्याची आठवण करून दिली. जानेवारी महिन्यात चंदीगड महापौर निवडणुकीत भाजपच्या मनोज सोनकर यांना 16 मते मिळाली होती. तर काँग्रेस-आपचे संयुक्त उमेदवार कुलदीप कुमार यांना 12 मते मिळाली होत. तर रिटर्निंग ऑफिसर अनील मसीह यांनी 8 मते अवैध ठरविली होती. या निवडणुकीनंतर काँग्रेस आणि आपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने मसीह यांना उद्देशून कठोर टिप्पणी केली होती. मसीह यांच्यावर महापौर निवडणुकीदरम्यान मतपत्रिकांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे.









