पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक, चौकशी सुरु
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतात बेकायदा घुसखोरी करणाऱ्या एका रॅकेटचा भांडाफोड दिल्ली पोलिसांनी केला असून पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. तसेच घुसखोरांसाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या सहा जणांनाही अटक करण्यात आली आहे. दिल्लीचे डीसीपी अंकित चौहान यांनी ही माहिती मंगळवारी दिली.
दिल्लीत काही दिवसांपूर्वी सेल्तन शेख नावाच्या व्यक्तीचा खून झाला होता. या खुनाचा तपास करताना या रॅकेटचा सुगावा पोलिसांना लागला आहे. शेख हा बांगला देशी नागरीकांना भारतात बेकायदेशीरपणे येण्यास साहाय्य करीत होता. तसेच घुसखोरांसाठी बनावट आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे तयार करण्यातही साहाय्य करीत होता. या कामात त्याला जे लोक साहाय्य करीत होते, त्यांनीच त्याची व्यक्तीगत कारणांवरुन हत्या केली होती, असे तपासात उघड झाले आहे. या आरोपींना पकडण्यात आले असून त्यांच्या चौकशीत त्यांनी या रॅकेटची माहिती उघड केली. त्यानुसार पुढील हालचाली करुन पोलिसांनी घुसखोरांना अटक केली.
बनावट कागदपत्रे जप्त
अटक केलेल्यांकडून पोलिसांनी 21 बनावट आधारकार्डे, 6 बनावट पॅनकार्डे आणि 4 मतदान कार्डे जप्त केली आहेत. बांगलादेशी घुसखोरांना अशी बनावट कार्डे अवघ्या 20 रुपयांमध्ये करुन देण्याची व्यवस्था या टोळीतील लोक करीत होते, असेही उघड झाले आहे. बांगलादेशी घुसखोरांना वनभागातील आडमार्गाने भारतात आणण्यात येते अशी माहितीही या तपासात मिळाली आहे. घुसखोरांना सीम कार्डे आणि अर्थसाहाय्यदेखील ही टोळी पुरवत होती. दिल्ली पोलिसांनी या टोळीच्या सविस्तर तपासासाठी बांगला देशातही आपले पथक पाठविले आहे.









