अमेरिकेच्या प्रशासनाने मोहम्मद युनूस यांना सुनावले : मानवाधिकारांचे उल्लंघन होऊ देऊ नका
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांवरुन अमेरिकेच्या प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे. व्हाइट हाउसकडून बांगलादेशच्या अंतरित सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांना कठोर संदेश देण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांच्याकडून करण्यात आलेल्या फोन कॉलदरमयन बांगलादेशातील मानवाधिकारांची बिघडती स्थिती आणि लोकशाहीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांवरून अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. जेक सुलिवन आणि मोहम्मद युनूस यांच्या चर्चेत मुख्य मुद्दा बांगलादेशातील मानवाधिकारांच्या रक्षणाचा होता. व्हाइट हाउसकडून जारी वक्तव्यानुसार सुलिवन यांनी चिंता व्यक्त केल्यावर युनूस यांना धार्मिक भेदभाव न करता सर्व नागरिकांच्या मानवाधिकारांचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले आहे. तर सुलिवन यांनी बांगलादेशातील बिघडणारी स्थिती सांभाळण्याकरता वेगाने पावले न उचलण्याप्रकरणी युनूस यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
प्रत्येक नागरिकाच्या मानवाधिकारांचे रक्षण करणे कुठल्याही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. धर्म, जात अन् कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ नये. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेले अत्याचार रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्यात यावी असे अमेरिकेने मोहम्मद युनूस यांना सुनावले आहे. तर या चर्चेदरम्यान युनूस यांनी मानवाधिकारांचे रक्षण आणि लोकशाहीवादी मूल्ये रुजविण्याचे आश्वासन दिले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की
मागील काही महिन्यांपासून बांगलादेशात हिंदू अन् इतर अल्पसंख्याक समुदायांवर होत असलेल्या हल्ल्यांचे वृत्त आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांकडून प्रकाशित होत आहे. अमेरिकेच्या विदेश विभागाने यापूर्वीच अल्पसंख्याकांच्या अधिकारांवरून बांगलादेश सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. अलिकडेच हिंदू नेते चिन्मय कृष्ण दास यांना झालेली अटक आणि त्यांच्या वकिलांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर अमेरिकेने बांगलादेश सरकारला फटकारले आहे. याचबरोबर अमेरिकेत राहत असलेल्या बांगलादेशी वंशीय नागरिकांनी मायदेशात सुरू असलेल्या हिंसेच्या विरोधात निदर्शने केली आहेत. या निदर्शनांमुळे बांगलादेशवरील आंतरराष्ट्रीय दबाव वाढला आहे.
बांगलादेशात हिंसेच सत्र
बांगलादेशात जून महिन्यापासून सातत्याने राजकीय उलथापालथ दिसून येत आहे. हिंसक निदर्शनांनंतर ऑगस्टमध्ये पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला होता. त्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. तेव्हापासून हसीना यांचा पक्ष अवामी लीगच्या नेत्यांवर आणि हिंदूंवर बांगलादेशात हल्ले होत आहेत. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांवरून भारत आणि अमेरिकेसह अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेतील खासदार श्रीनिवास ठाणेदार यांनी बांगलादेशच्या नेतृत्वासमोर हा मुद्दा ठोसपणे उचलण्याची मागणी अमेरिकेच्या प्रशासनाकडे केली होती. युनूस यांचे नेतृत्व हिंदूंवरील हल्ले रोखण्यास अपयशी ठरले आहे. तसेच जमात-ए-इस्लामी आणि कट्टरवादी संघटनांना नियंत्रित करणे युनूस यांना शक्य झाले नसल्याचे वक्तव्य हिंदू अॅक्शनचे कार्यकारी संचालक उत्सव चक्रवर्ती यांनी केले आहे.









