कोल्हापूर / आशिष आडिवरेकर :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिन्यात होणार असल्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे चार वर्ष रखडलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्याचे संकेत मिळाले आहेत. असे असले तरी पहिल्या टप्प्यात नेमकी प्रभाग रचना कशी असणार, निवडणुकीत तीन सदस्यीय की चार सदस्यीय प्रभाग रचना असणार, यासोबत आरक्षणाचीही स्पष्टता नसल्यामुळे इच्छुकांमध्ये या निवडणुकीबाबत घालमेल सुरु आहे. निवडणूक स्वबळावर लढणार की आघाडी धर्मानुसार लढली जाणार, यामुळेही इच्छुकांच्या मनात धास्ती आहे.
कोल्हापूर महापालिकेची 15 नोव्हेंबर 2020 मध्ये सभागृहाची मुदत संपली. 4 वर्षापासून महापालिकेत प्रशासकराज आहे. महापालिकेची निवडणूक कोरोना निर्बंध काळ आणि ओबीसी आरक्षण, प्रभाग संख्येवरुन हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. यावर अद्यापी निर्णय झालेला नाही. दरम्यान, राज्यात महायुती सरकार सत्तेवर आले. नुतन मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे रखडलेल्या महापालिका निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या 2015 च्या निवडणुकीवेळी 81 प्रभाग होते. एकसदस्यीय प्रभाग रचना होती. आगामी निवडणुकीमध्ये नेमके किती प्रभाग असणार, तीन सदस्यीय की चार सदस्यीयांचा एक प्रभाग असणार याबाबतही स्पष्टता नाही. काहींच्या मते महायुती सरकार चार सदस्यीय प्रभाग रचना करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. प्रत्यक्षात निवडणुकीवेळीच याचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी तीन महिन्यात निवडणूक लागेल, असे जाहीर केल्यामुळे इच्छुकांमध्ये निवडणुकीविषयी चर्चा रंगू लागली आहे. त्रिसदस्यीय प्रभाग रचना झाल्यास अथवा चार सदस्यीय प्रभाग रचना झाल्यास कोणती रणनिती आखली पाहिजे, याबाबतही त्यांच्यामध्ये उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
नेमकी आघाडी कशी असणार ?
2015 च्या निवडणुकीमध्ये महापालिकेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी आघाडी होती. तर विरोधात भाजप–ताराराणी आघाडी होती. गेल्या 9 वर्षात राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. विशेष करुन 2022 नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फुट पडली आणि राज्यात प्रमुख 6 पक्ष अस्तित्वात आले आहेत. यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट यांची महाविकास आघाडी तर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती झाली आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती मधील पक्ष स्वतंत्र लढणार की आघाडीनुसार एकत्र लढणार याबाबतही जिह्यातील नेत्यांमध्येच मतमतांतरे दिसून येत आहेत. त्यामुळे इच्छुकांसमोर निवडणुकीत कोणता झेंडा हाती घ्यायचा, याबाबतही प्रश्न निर्माण झाला आहे.
महापौर जनतेतून की नगरसेवकांतून ?
महायुतीने लोकनियुक्त सरपंच, नगराध्यक्ष याप्रमाणेच थेट महापौरही जनतेतून निवडून देण्याची शक्यता आहे काय, असाही प्रश्न आहे. किंवा नगरसेवकांमधूनच महापौर निवडला जाणार, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. लोकनियुक्त महापौर करण्याचा निर्णय झाला तर, महापौरपदासाठी इच्छुकांसमोर मोठे आव्हान असणार आहे. संबंधीत उमेदवार हा दांडगा लोकसंपर्क तसेच साम, दाम दंड भेदाचा वापर करु शकेल, अशा उमेदवाराचे पारडे जड होणार आहे.
राजकीय समिकरणे कशी राहणार ?
गेली 10 वर्षे महापालिकेवर आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांची एकहाती सत्ता होती. मात्र राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांनुसार आता मुश्रीफ महायुतीमध्ये आहेत. आमदार राजेश क्षिरसागरही महापालिकेच्या राजकारणात महायुतीसोबत असणार आहेत. निवडणुकीत पक्ष स्वबळावर लढणार की निवडणुकीनंतर एकत्र येणार, हे पाहणे औत्सुक्याचे झाले आहे.
सत्तांतरानंतर इच्छूकांचा कल कोणाकडे राहणार ?
2020 मध्ये महापालिकेचे सभागृह संपुष्टात आल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली होती. यावेळी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती. कोल्हापूरचे पालकमंत्रीही आघाडीचे होते. अशा परिस्थितीमध्ये इच्छुकांचा कल आघाडीतून उमेदवारी मिळण्याकडे होता. आता सत्तांतर झाले आहे. केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता आहे. पालकमंत्रीही महायुतीचाच असणार आहे. त्यामुळे इच्छुकांचा कल कोणाकडे आहे, हे पहावे लागणार आहे.
पक्षीय बलाबल
काँग्रेस 30
राष्ट्रवादी 14
ताराराणी 19
भाजप 14
शिवसेना 4
एकूण 81








