कैद्याकडून अधिकारी पैसे घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल : कारागृह पुन्हा चर्चेत, सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
बेळगाव : हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना ऐशआरामी जीवन जगण्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची साथ लाभल्याचे दिसून येत आहे. कैद्याकडून पैसे घेत त्यांना मासळीचे जेवण पुरविले जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हिंडलगा कारागृह पुन्हा एकदा राज्यात चर्चेत आले आहे. नेहमी या ना त्या कारणावरून हिंडलगा मध्यवर्ती कारागृह चर्चेत असते. कारागृहात कुविख्यात कैदी बंदिस्त असतानादेखील त्याचे गांभीर्य कारागृह प्रशासनाला नसल्याने कारागृहाचा सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. अलिकडेच गांजावरून एका कैद्याने जेलरवर हल्ला केल्याप्रकरणी, तसेच कारागृहात जुगार खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णमूर्ती यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांपूर्वी कारागृहात मोबाईल वापरल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा पोलिसात दाखल झाला आहे. सातत्याने बेकायदेशीर घडामोडी घडत असल्याने कारागृहाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक मालिनी कृष्णमूर्ती यांनी कारागृहाला भेट देऊन अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. त्यानंतर कारागृहातील कारभारात सुधारणा होईल, असे वाटत होते. मात्र उलट पुन्हा बेकायदेशीर घडामोडी वाढीस लागल्या आहेत.
दर शुक्रवारी कैद्यांना जेवणात चिकन आणि मटण दिले जाते. पण मासळीचे जेवण देण्याचा मेन्यू कारागृहात नाही. पण एका पोलीस उपनिरीक्षकाच्या खून प्रकरणात बंदिस्त असलेल्या कैद्याकडून पैसे घेत मासळीचे जेवण पुरविल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. तसेच पैसे घेतानाचा व्हिडिओही चर्चेत आल्याने प्रसारमाध्यमावर तो दाखविला जात आहे. बेळगावात पार पडलेल्या अधिवेशन काळात प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी हिंडलगा कारागृहातील बेकायदेशीर घडामोडींबाबत गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांना प्रश्न विचारला होता. मात्र त्यांनी सर्व काही व्यवस्थित असल्याचे सांगत सारवासारवी केली होती. मात्र आता पुन्हा एकदा हिंडलगा कारागृहातील कैदी कशा पद्धतीने ऐशआरामी जीवन जगत आहेत. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आता तरी गृहखात्याला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.









