शतकमहोत्सवी काँग्रेस अधिवेशनाची जोरदार तयारी
बेळगाव : काँग्रेसचे शतकमहोत्सवी अधिवेशन दि. 26 व 27 डिसेंबर रोजी बेळगावमध्ये होणार आहे. यानिमित्ताने बेळगावमधील सर्व सरकारी शाळांमध्ये महात्मा गांधीजींचे बॅनर लावण्याची सूचना गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे शाळांना आपल्या खर्चातून अधिवेशनाचे फलक शाळेमध्ये लावावे लागणार आहेत. बेळगावमध्ये महात्मा गांधीजी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. या कार्यक्रमाचा शतकपूर्ती समारंभ बेळगावमध्ये होणार आहे. यानिमित्ताने शहरात जोरदार तयारी करण्यात आली आहे.
सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आली असून सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. याबरोबरच वीरसौध परिसरातही सुशोभिकरण करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना काँग्रेस अधिवेशनाबाबत माहिती व्हावी, या उद्देशाने बॅनर्स तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक सरकारी शाळेमध्ये हे बॅनर्स लावण्याच्या सूचना जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना केल्या आहेत. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या सूचना प्रत्येक शाळेला केल्या असून बुधवारपूर्वी बॅनर्स लावण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे शाळेचे शिक्षक सोमवारपासून बॅनर प्रिंटींगच्या कामासाठी धावपळ करीत आहेत.









