काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दीची तयारी सध्या सुरू आहे. या अधिवेशनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. परंतु त्याची माहिती अनेकांना नाही. देश घडविणाऱ्या युगपुरुषांच्या भेटीची नेंद घेणारा हा लेख…
राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कर्नाटकातील बेळगाव येथे दि. 23 ते 27 डिसेंबर 1924 रोजी विजयनगरला लागून असलेल्या टिळक नगरात आयोजित केले होते. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी महात्मा गांधी यांची एकमताने निवड झाली होती. त्यांच्यासोबत देशबंधू,-दास, पंडित नेहरू, मोतीलाल नेहरू, कस्तुरबा, राजगोपालाचारी, मौलाना हसरत अली, मौलाना शौकत अली, वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू आदी काँग्रेसच्या उच्च पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते. त्या राष्ट्रीय अधिवेशनात काँग्रेसच्या खजिनदार व प्रधान कार्यवाहचे कार्य, राष्ट्रीय कामाचा मोबदला घेणे धोरणासंबंधी, दारू व अफूच्या व्यापाराला विरोध करणे यासह अनेक धोरणांवर चर्चा होणार होती.
बेळगावच्या या ऐतिहासिक अधिवेशनामध्ये अस्पृश्यता निर्मूलनाच्या संबंधाने ठराव करण्यात येणार असल्याची चर्चा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वत्र केल्यामुळे कोल्हापूर-सांगलीबरोबरच चिकोडी, रायबाग, नवन्याळ, कोथळी, कागवाड, निपाणी, कारदगा, सदलगा, हुबळी, धारवाड आदी खेडोपाड्यांतून अस्पृश्य वर्गही एकवटला होता. अवघ्या चार महिन्यांपूर्वी 20 जुलै 1924 रोजी ‘बहिष्कृत हितकारणी सभा’ या संस्थेची निर्मिती केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अधिवेशनात 26 तारखेला जातीने उपस्थित होते. कारण, ‘अस्पृश्यांचा उद्धार’ या एकमेव उद्दिष्टापायी स्थापन झालेल्या या संस्थेचे ते सर्वेसर्वा होते. दि. 26 रोजी अधिवेशनात पोहचलेल्या डॉ. आंबेडकरांनी तीन दिवसांपूर्वी अधिवेशनामध्ये अस्पृश्यांसंबंधी काही चर्चा झाली का, याची संयोजक मंडळींकडे चौकशी केली. मात्र, त्यांची निराशा झाली.
बेचैन डॉ. आंबेडकर अधिवेशनातून बाहेर
या अधिवेशनात अस्पृश्यता निर्मूलनाच्या संबंधाने काही एक मत सुचवायचे आहे, परवानगी द्यावी, अशा आशयाची चिठ्ठी त्यांनी गांधीजींना पाठवली. गांधीजींनी चिठ्ठी वाचली. तासावर तास निघून जात होते, अनेक भाषणे आणि अनेक ठराव होऊन जात होते, तरी त्या दिवशी अस्पृश्यांच्या संबंधाने कोणतीच चर्चा झाली नाही. अधिवेशनात ताटकळत राहिलेले डॉ. आंबेडकर कमालीचे बेचैन झाले. ते तडक काँग्रेसच्या अधिवेशनातून बाहेर पडले. काँग्रेसने विशेषत: गांधींनी आपल्याला पाहूनही, आपणाला बेदखल केले ही गोष्ट त्यांच्या मनाला लागून राहिली होती. गांधी स्वत:ला काय समजतात, ते बॅरिस्टर असले म्हणून काय झाले, आम्हीसुद्धा बॅरिस्टरच आहोत, अस्पृश्य लोक आमची मक्तेदारी आहे. त्यांना आम्ही आमचेच म्हणून गृहीत धरू, असे जर कोणी स्वत:ला समजत असेल तर त्याचे आम्ही मुळीच ऐकणार नाही. विनंती करूनही अस्पृश्यांच्या प्रश्नावर एखाद्या सुशिक्षित अस्पृश्याला बोलूच देत नसतील तर हे कोण लागून गेले, असे प्रश्न त्यांना पडले.
गेले तीन दिवस अधिवेशनात बसून राहिलेल्या देवराय इंगळे आणि त्यांच्या अस्पृश्य सहकाऱ्यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. ते तात्काळ डॉ. आंबेडकरांच्या जवळ आले. दोघेही बोलत बोलत काळ्या आमराईच्या मैदानावर आले. देवराय यांनी आपल्या सोबतच्या दोघा-तिघांना डॉ. आंबेडकरांच्या जवळ उभे केले. काहींना समाजात पाठविले आणि त्यातील काही साथीदारांसह ते पुन्हा अधिवेशनामध्ये गेले. त्यांनी अधिवेशनामध्ये बसलेल्या आपल्या बांधवांत फेरफटका मारला आणि थोड्याच वेळात डॉ. आंबेडकर उभे राहिलेल्या ठिकाणी बघता बघता दीड-दोन हजारांची गर्दी जमा झाली. इराप्पा मेत्री, देवाप्पा चवगले, रामा घाडगे, खाड्याचं दाम्पत्य, आंदु तुपे, बसवंत हलगेनवर, फकीराप्पा देवरमनी, सटवाजी कांबळे, देवाप्पा कांबळे, हरसिंह धामूने, परसराम ढोर, मोहनसिंग धामूने या महार, मांग, ढोर, चांभार ही मंडळी देवरायांचा निरोप ऐकताच एकत्र आली.
डॉ. आंबेडकरांचा काँग्रेसला टोला
आता मात्र डॉ. आंबेडकर यांना आपल्या अस्पृश्य जनतेसाठी कोणता ना कोणता तरी संदेश देणे अपेक्षित होते. डॉ. आंबेडकर बोलायला उभे राहिले. त्यांनी काँग्रेस हा दलितांचा, अस्पृश्यांचा पक्ष होऊच शकत नसल्यामुळे आम्हाला त्या पक्षाशी काहीही घेणे-देणे नाही, असे आपल्या बांधवांना मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले. काँग्रेसने अस्पृश्यांना गृहीत धरून आपले पुढे जाण्याचे जो धोरण सुरू ठेवले आहे. ते पुढे मागे त्यांना अडचणीचेही ठरू शकते, असा टोलाही त्यांनी आपल्या भाषणामधून काँग्रेसला लगावला.
आपली अस्मिता काय, आपली धोरणे कोणती, आपली एकी किती गरजेची आहे, या अनुषंगाने तब्बल अर्धा-पाऊण तास त्यांनी भाषण केले. भाषण संपताच उपस्थित अस्पृश्य बांधवांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करत आपल्या नेत्याचा गौरव केला आणि आपला मार्गदर्शक म्हणून डॉ. आंबेडकर या उच्च विद्याविभूषिताचा त्यांनी जाहीरपणे स्वीकार केला. त्या साऱ्यांनी येथून पुढे आपल्या नेत्याच्या मार्गदर्शनाने पुढे जाण्याचे ठरविले आणि सभा बरखास्त झाली. मात्र, ही कोणाची सभा होती हे पाहण्यासाठी पोलिसांनी सभेच्या ठिकाणी तात्काळ धाव घेतली. कारण, ही सभा अगदी अनपेक्षितपणे पार पडलेली होती. बघत राहण्याव्यतिरिक्त दुसरे काहीच त्यांना करता येण्यासारखे नव्हते. डॉ. आंबेडकर जेव्हा परतीच्या प्रवासाला लागले तेव्हा देवरायांनी पुन्हा एकदा डॉ. आंबेडकर यांना बहिष्कृतांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण निपाणीसारख्या शहराच्या ठिकाणी जरूर यावे, असे आग्रहपूर्वक विनविले.
अस्पृश्य बांधवांची गांधींच्या अधिवेशनाकडे पाठ
त्यांच्या या घणाघाती भाषणाने अस्पृश्यांत मोठे चैतन्य पसरले. त्यांची हिम्मत वाढली, त्यांच्यात मोठे धैर्य संचारले. अंगात हत्तीचं बळ संचारल्यासारखी भावना झालेल्या या अस्पृश्य बांधवांनी गांधींच्या अधिवेशनाकडे सपशेल पाठ फिरवली आणि तडक आपल्या घराचा रस्ता धरला. कारण, आज त्यांना त्यांचा पुढारी मिळाला होता. मात्र, कोणत्या ना कोणत्या मार्गाने गांधीजींच्या कानावर डॉ. आंबेडकर यांनी काळ्या आमराईत काल रात्री घेतलेल्या काँग्रेसविरोधी सभेचा वृत्तांत गेलाच! बऱ्याच विचारांती गांधीजी एका निर्णयापर्यंत आले. आपल्या शिरावर भारतातील काँग्रेसचा मुकुट आहे याची त्यांना जाणीव झाली असावी. डॉ. आंबेडकर हे काँग्रेसचे प्रतिनिधी नव्हते. मात्र, येथे गांधीजी एका वेगळ्याच पवित्र्यात दिसले. ते म्हणाले,
‘एक अस्पृश्य बंधू जो प्रतिनिधी नाही, त्याला चार शब्द बोलायचे आहेत अशी एक चिठ्ठी माझ्याकडे आली होती. तो जरी प्रतिनिधी नसला तरी तो अस्पृश्य असल्यामुळे त्याला बोलायला परवानगी दिली तर बरे होईल, असे मला वाटले. पण मी विसरलो. त्याबद्दलचे प्रायश्चित म्हणजे त्याची माफी मागणे! गांधींच्या या खुलाशाने साऱ्या अधिवेशनात संथ शांतता पसरली. मात्र, गांधीजींचा हा माफीनामा ऐकण्यासाठी डॉ. आंबेडकर तेथे उपस्थित राहिले नव्हते. ते आदल्या दिवशीच मुंबईला पोहोचले होते. ते काहीही असले तरी गांधीजींच्या या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाने कर्नाटकातील अस्पृश्यांना मात्र डॉ.आंबेडकरांसारखा उच्चविद्याविभूषित महान नेता मिळाला होता.
(डॉ. संभाजी बिरांजे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधन प्रकाशन समिती या महाराष्ट्र शासनाच्या समितीचे सदस्य असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे येथे संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)
-डॉ. संभाजी बिरांजे

(डॉ. संभाजी बिरांजे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधन प्रकाशन समिती या महाराष्ट्र शासनाच्या समितीचे सदस्य असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे येथे संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)







