विधिमंडळ अधिवेशनानंतर साफ दुर्लक्ष : पाण्याविना झाडे गेली सुकून
बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी शहरातील दुभाजकांवर रोपे लावण्यात आली होती. परंतु, अधिवेशन संपून चार दिवस होत नाहीत, तोवर ही रोपे सुकली. त्यामुळे सुकणाऱ्या या रोपांना आता वाली कोण? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. केवळ मंत्री व आमदारांना दिखाऊपणासाठी करण्यात आलेला वारेमाप खर्च वाया गेल्याचे दिसत आहे. यावर्षी 9 डिसेंबरपासून बेळगावमध्ये अधिवेशन झाले. अधिवेशना दरम्यान आठ दिवस कामकाज चालले. अधिवेशनासाठी शहरातील रस्ते, दुभाजक चकाचक केले. दुभाजकांवर रोपांची लागवड करून त्यांना पाण्याच्या व्यवस्थेसाठी प्लास्टिकच्या जुन्या बाटल्यांचा वापर केला. यामुळे या नव्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा झाली. परंतु, हा उपक्रम कायमस्वरुपी आहे की तात्पुरता हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहिला.
अधिवेशन संपले, झाडेही सुकली
गुरुवार दि. 19 रोजी अधिवेशनाचे सूप वाजले. अधिवेशन संपताच रोपांना पाणी घालणेही बंद झाले. यामुळे अवघ्या चारच दिवसात दुभाजकांवरील रोपे सुकून गेली. दुभाजकांवर माती घालून रोपलागवड करणे, त्याला प्लास्टिकच्या बाटल्या जोडणे, लागलेली मजुरी हा संपूर्ण खर्च वाया गेल्याचे दिसून येत आहे. जे उपक्रम शेवटपर्यंत लागू केले जात नाहीत ते सुरूच का केले जातात? असा प्रश्न उपस्थित होत आहे.









