ग्रामस्थांचा हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा : येत्या चार दिवसात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन
खानापूर : तालुक्यातील भीमगड अभयारण्य क्षेत्रातील अती दुर्गम अशा मेंडील येथे गेल्या सात महिन्यांपासून वीजपुरवठा बंद असल्याने मेंडील ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड देत जीवन जगावे लागत आहे. वेळोवेळी अर्जविनंत्या करुनदेखील हेस्कॉमने वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत कोणताही क्रम घेतला नसल्याने सोमवारी मेंडील ग्रामस्थांनी हेस्कॉमवर मोर्चा काढून वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अन्यथा धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी हेस्कॉमचे कार्यकारी अभियंते मोहीते यांनी येत्या चार दिवसात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.
तालुक्यातील भीमगड अभयारण्य क्षेत्रातील अती दुर्गम आणि तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या मेंडील येथे वीजपुरवठा करण्यात आलेला नाही. गेल्या 75 वर्षापासून हे गाव अंधारातच चाचपडत आहे. अती दुर्गम भागात असल्याने हिंस्त्र प्राण्यांचा धोका मोठ्याप्रमाणात आहे. अशातच विद्यार्थ्यांनाही वीजपुरवठा नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाने रेशनवरील रॉकेल पुरवठाही बंद केल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना तेंड देत जीवन जगावे लागत आहे.
हेस्कॉम अधिकाऱ्यांचे अर्जविनंती करूनही साफ दुर्लक्ष
गेल्या आठ वर्षापूर्वी शासनाकडून मेंडील येथे सौरउर्जेवर वीजपुरवठा करण्यात आला होता. मात्र वेळोवेळी सौरउर्जेवर वीजपुरवठा खंडित होत आहे. गेल्या आठ महिन्यापासून सौरउर्जेतील यंत्रात बिघाड झाल्याने मेंडील येथील संपूर्ण वीजपुरवठा बंद पडलेला आहे. याबाबत खानापूर हेस्कॉम अधिकाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत वेळोवेळी अर्जविनंत्या करण्यात आल्या. मात्र याबाबत अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केल्याने मेंडील ग्रामस्थांना गेल्या आठ महिन्यांपासून अंधारातच जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अर्जविनंत्याची दखल घेत नसल्याने मेंडील ग्रामस्थांनी सोमवारी हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी लावून धरली. यावेळी हेस्कॉमचे कार्यकारी अभियंते मोहीते यांनी येत्या चार दिवसात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी शिरोली ग्रा.पं. सदस्य दीपक गवाळकर, विजय मादार, नामदेव अनगोळकर, मष्णू पाटील, रमेश पाटील, कृष्णा पाटील, भीमराव पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.









