मायदेशात आफ्रिकेवर वनडे मालिका एकतर्फी गमावण्याची वेळ : तिसऱ्या वनडेत पाकचा 36 धावांनी विजय
वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
रविवारी रात्री उशिरा झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तानने यजमान द.आफ्रिकेचा 36 धावांनी पराभव केला. या विजयासह पाकने वनडे मालिकेतील तीनही सामने जिंकत निर्भेळ यश मिळवले आहे. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्याचा निर्णय डीएलएस पद्धतीने घेण्यात आला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 47 षटकांत 9 बाद 308 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 42 षटकांत सर्वबाद 271 धावांवर आटोपला. दरम्यान, शतकी खेळीसह मालिकेत 235 धावा करणाऱ्या पाकच्या सॅम अयुबला सामनावीर व मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या पाकच्या डावाची सुरुवात खराब झाली. एका धावेवर संघाने अब्दुल्ला शफीकची विकेट गमावली. अशा परिस्थितीत सलामीवीर सैम अयुबने बाबर आझमच्या साथीने शतकी भागीदारी करत संघाचा डावा सावरला. आझमने 52 धावा केल्या. आझम बाद झाल्यानंतर मोहम्मद रिझवानने अयुबला चांगली साथ देत संघाचे द्विशतक फलकावर लावले. रिझवानने 52 चेंडूत 53 धावा फटकावल्या तर सॅम अयुबने शतकी खेळी साकारताना 94 चेंडूत 101 धावांचे योगदान दिले. याशिवाय, सलमान आगाने 48 तर तैय्युब ताहिरने 28 धावा केल्या. पाकच्या इतर फलंदाजांना मात्र अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यांनी 47 षटकांत 9 गडी गमावत 307 धावा केल्या. आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने 3 बळी घेतले. मार्को जॅन्सन आणि ब्योर्न फॉर्च्युइनने 2-2 विकेट घेतल्या.
आफ्रिकेचे सपशेल लोटांगण
डीएलएसमुळे आफ्रिकन संघाला 47 षटकांत 308 धावांचे लक्ष्य मिळाले होते. परंतु 42 षटकांत 271 धावा करून संघ गडगडला आणि 36 धावांच्या फरकाने त्यांनी हा सामना गमावला. हेन्रिक क्लासेनने सर्वाधिक 81 धावा केल्या तर रॉस्यूने 35, यान्सेनने 26 तर कॉर्बिन बोसने नाबाद 40 धावांचे योगदान दिले. इतर आफ्रिकन फलंदाज मात्र अपयशी ठरल्याने त्यांना या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानकडून सुफियान मुकीमने 4 तर शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाहने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान 47 षटकांत 9 बाद 308 (सॅम अयुब 101, बाबर आझम 52, रिझवान 53, सलमान आगा 48, रबाडा 3 बळी)
दक्षिण आफ्रिका 42 षटकांत सर्वबाद 271 (हेन्रिक क्लासेन 81, रॉस्यू 35, कॉर्बिन बोस नाबाद 40, सुफियान मुकीम 4 बळी).
मायदेशात प्रथमच आफ्रिकेवर नामुष्कीची वेळ
मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेत ऐतिहासिक अशी कामगिरी साकारली आहे. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वात पाकने प्रथम ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्धही संघाने विजयी चव चाखली. मात्र संघाने दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेला 3-0 ने पराभूत करण्याचे काम केले आहे. इतकेच नाही तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्यांच्याच भूमीवर क्लीन स्वीप करणारा पाकिस्तान हा जगातील पहिला देश ठरला आहे. आतापर्यंत इतर कोणत्याही संघाला हे करता आलेले नाही.









