दोन दिवसांत दुसरी घटना : नागरिक भयभीत
वार्ताहर/किणये
संतिबस्तवाड गावात पुन्हा एकदा एका माकडाने बालिकेवर हल्ला केला आहे. यामुळे गावात माकडांच्या दहशतीची भीती निर्माण झाली आहे. शनिवारी एका बालकावर माकडाने हल्ला केला होता. तो बालक सध्या गंभीर अवस्थेत असून त्याच्यावर सरकारी इस्पितळात उपचार सुरू आहेत. मात्र, पुन्हा रविवारी एका बालिकेवर माकडाने हल्ला केल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. शिवांशी सतीश होनगेकर (वय 7) असे जखमी झालेल्या बालिकेचे नाव आहे. ती रविवारी बसवाण गल्ली येथे खेळत होती. यावेळी माकडाने तिच्यावर हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली, अशी माहिती स्थानिकांनी दिली. तिला सध्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गावात वारंवार विद्यार्थ्यांवर माकडांकडून हल्ले होत असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. शनिवारी अर्पित नावाच्या 8 वर्षांच्या बालकावर माकडाने हल्ला केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सरकारी इस्पितळात उपचार सुरू असतानाच पुन्हा रविवारी एका मुलीवर माकडाने हल्ला केल्यामुळे गावात भीती निर्माण झाली आहे.









