सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे भिजत घोंगडे, रुग्णांची हेळसांड : जिल्हा रुग्णालयात 140 बेडची सोय
बेळगाव : जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने सध्या उपलब्ध असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर भार पडत आहे. त्यातच सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळत नसल्याने जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला ग्रहण लागल्याचे पहावयास मिळत आहे. जिल्हा रुग्णालय, 139 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 616 उपआरोग्य केंद्रांसह महापालिकेच्या व्याप्तीत येणारी दोन रुग्णालये असूनदेखील रुग्णांना सरकारी हॉस्पिटलमध्ये आवश्यक आरोग्यसेवा मिळणे कठीण झाले आहे. जिल्हा रुग्णालयात 140 बेड आहेत. शस्त्रचिकित्सा विभाग, माता-शिशू विभागासह विविध विभाग असून दररोज शहर, उपनगर, तालुका, ग्रामीण भागासह परजिल्ह्यातून शेकडो रुग्ण येत असतात. इतकेच नव्हे तर शेजारील गोवा आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक आहे. रुग्णालयात 30 टक्के डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्याचबरोबर वैद्यकीय उपकरणांची कमतरता असून सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झाल्यास त्या ठिकाणी 450 बेड असणार आहेत. जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये 139 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. मात्र, त्या ठिकाणीही येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. तेथील रुग्णालयांमध्येही आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. तर काही ठिकाणी डॉक्टरच नाहीत. उपलब्ध डॉक्टरांवर दोन ते तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांना समुदाय आरोग्य केंद्रांचा दर्जा देणार
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना समुदाय आरोग्य केंद्रांचा दर्जा देण्यात येणार आहे. मात्र, सदर प्रस्तावाला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. भौगोलिकदृष्ट्या मोठा असलेल्या बेळगाव जिल्ह्याला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
उत्तम सेवेअभावी माता-शिशूंच्या मृत्यू प्रमाणात वाढ
जिल्हा रुग्णालयात दररोज 25 गर्भवतींची प्रसूती होते. त्यामुळे माता आणि शिशुंना उत्तम आरोग्यसेवा मिळावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी केली जात आहे. मात्र, सरकारकडून या सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात येत नसल्याचा आरोप केला जात असून त्यामुळेच माता आणि शिशुंच्या मृत्यूंच्या प्रमाणात वाढ झाल्याचे बोलले जात आहे.
38 कोटी रुपयांचे अनुदान आवश्यक
जिल्हा रुग्णालयाच्या आवारात 188 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी वर्षाकाठी 38 कोटी रुपयांचे अनुदान आवश्यक आहे. या हॉस्पिटलमध्ये ए आणि बी श्रेणीच्या 570 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली पाहिजे. यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
– डॉ. अशोककुमार शेट्टी (संचालक, बिम्स)









