गणेश कॉलनी, वडगाव येथील नागरिकांची मागणी
बेळगाव : ड्रेनेजच्या समस्येमुळे गणेश कॉलनी तिसरा क्रॉस वडगाव येथील रहिवासी हैराण झाले आहेत. ड्रेनेजमधून येणारा मैला आणि सांडपाणी एकाच ठिकाणी तुंबून राहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांची पैदास वाढली आहे. त्यातच कचरा उचल करणारे वाहनदेखील येत नसल्याने रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे याकडे महापालिका आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून तातडीने समस्या मार्गी लावावी, अशी मागणी केली आहे. परिसरात ड्रेनेज लाईन घालण्यात आली असली तरी तेथून पुढे ड्रेनज लाईन नसल्याने येणारे सांडपाणी आणि मैला एका खुल्या जागेत तुंबून राहत आहे. गेल्या दीड वर्षांपासून ही परिस्थिती कायम आहे. सांडपाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका असून डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्वत्र दुर्गंधी पसरली असल्याने लोकांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यातच कचरा उचल करणारे वाहनदेखील येत नसल्याने लोकांना नागरी सुविधा मिळणे दुरापास्त झाले आहे. याबाबत अनेकवेळा महापालिकेकडे समस्या सोडविण्याबाबत मागणी करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने रहिवाशांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.









