मेलबर्न
बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथी कसोटी मेलबर्नवर होणार असून 2022 च्या टी20 विश्वचषकात माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीने याच मैदानावर पाकिस्तानविऊद्ध आश्चर्यकारक पद्धतीने खेचून आणलेल्या विजयाच्या आठवणी लोकांच्या मनात जाग्या झाल्याशिवाय रहणार नाहीत. त्या घटनेला दोन वर्षे झालेली असली, तरी त्या सामन्यात 90 हजार उत्साही चाहत्यांनी कोहलीच्या नावाने केलेला जयघोष अजूनही लोकांना आठवेल. त्यावेळी कोहलीने 53 चेंडूंत नाबाद 82 धावा करून भारताला पराभवाच्या सावटातून सावरून विजय मिळवून दिला होता. आता तो पुन्हा एकदा विजयाच्या शोधात त्याच मैदानावर उतरणार आहे.
कोहलीने पर्थ येथे दुसऱ्या डावात शतक झळकावून ऑस्ट्रेलियातील मालिकेत चमकदार सुऊवात केली. पण तेव्हापासून त्याचा सूर बिघडलेला आहे. अॅडलेड आणि ब्रिस्बेन कसोटीतील पुढील चार डावांमध्ये त्याला फक्त 26 धावा काढल्या आहेत. तथापि, मैदानाबाहेर त्याची लोकप्रियता थोडीही कमी झालेली नसून एमसीजीचा एक छोटासा दौरा ही वस्तुस्थिती जाणवून देतो. ऑस्ट्रेलियन स्पोर्ट्स म्युझियमच्या तिकीट काउंटरवर कोहलीची छायाचित्रे पाहायला मिळतात. त्याशिवाय 2018-19 च्या मालिकेत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात मालिका विजय मिळवल्यानंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे चुंबन घेतानाचे त्याचे छायाचित्र तसेच एमसीजीवरील तिसऱ्या कसोटीनंतर संघाचे आनंदोत्सव साजरा करतानाचे छायाचित्रही येथे आढळते. या आनंदोत्सवाच्या छायाचित्राखाली ‘कोहलीचे विजेते’ असे लिहिलेले आहे.
एमसीजीवरील कामगिरी विचारात घेता 2011-12 मध्ये कोहली 7 व्या क्रमांकावर आला आणि त्याने 11 धावा करून दोन झेल घेतले. तीन वर्षांनंतर त्याने 169 धावा केल्या आणि अजिंक्य रहाणेसोबत 262 धावांची भागीदारी केली. दुसऱ्या डावात त्याने काढलेल्या 54 धावांमुळे भारताला सामना अनिर्णीत ठेवण्यास मदत झाली. 2018 मध्ये तो संघाचे नेतृत्व करत होता आणि पहिल्या डावात त्याने महत्त्वपूर्ण 82 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात मिचेल मार्श आणि एरॉन फिंचचे झेल घेतले. एकूणच कोहलीने या ऐतिहासिक मैदानावर तीन कसोटी सामन्यांमध्ये 52.66 च्या सरासरीने 316 धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.









