वृत्तसंस्था/ अबुधाबी
येथे सुरु असलेल्या विश्व टेनिस लिग सांघिक स्पर्धेतील लढतीत टीएसएल हॉक्सने शेवटच्या साखळी सामन्यात काईट्सचा 20-17 असा पराभव केला. या विजयामुळे टीएसएल हॉक्सने स्पर्धेच्या गुणतक्त्यात 67 गुणांसह दुसरे स्थान मिळविले आहे. आता त्यांचा पुढील सामना गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या गेम चेंजर्स फाल्कन्स बरोबर होणार आहे.
या स्पर्धेत गेम चेंजर्स फाल्कन्सने 68 गुणांस पहिले स्थान मिळविले आहे. काईट्सने या स्पर्धेच्या गुणतक्त्यात 63 गुणांसह तिसरे स्थान मिळविले आहे. होनोर एफएक्स इगल्सने या स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदविला. या विजयामुळे ते आता गुणतालिकेत 54 गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत.
टीएसएल हॉक्स आणि काईट्स यांच्यातील झालेल्या सामन्यात हॉक्स संघातील आर्यना साबालेंका आणि मीरा अँड्रीव्हा यांनी महिलांच्या दुहेरी विजय नोंदवून आपल्या संघाला 4-0 अशी आघाडी मिळवून दिली. या लढतीत साबालेंका आणि अँड्रीव्हा यांनी सेट 6-1 असा जिंकला. त्यानंतर अँड्रीव्हाने एकेरीच्या सामन्यात पाओलिनीचा 6-4 असा पराभव केला. पुरुष दुहेरीच्या सामन्यात किरगॉइस आणि कास्पर रुड या जोडीने सुमीत नागल आणि जॉर्डन थॉमसन यांचा 6-4 असा पराभव केला. कास्पर रुडने सुमीत नागलची सर्व्हिस भेदली. त्यानंतर रुडने हा सेट 6-3 अशा फरकाने जिंकला.









